
सावंतवाडी : शहरातील लाईट रात्री अपरात्री जात आहे. डासांचा प्रादुर्भाव वाढला असून उष्णतेमुळे नागरिक त्रस्त आहेत. विज वितरणचे अधिकारी जाग्यावर नाहीत. महावितरणचे फोन बंद आहेत. अन् आमदार मुंबईत झोपलेत. त्यामुळे जनतेने काय करायचे ? याची जबाबदारी कोणाची ? जनतेचा उद्रेक झाला तर जबाबदार कोण ? असा सवाल माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी विचारला आहे.
बुधवारी रात्री अडीच तास विद्युत पुरवठा खंडित झाला होता. महावितरणचे फोन लागत नसल्याने व अधिकारी कार्यालयात नसल्याने नागरिक आक्रमक झाले होते. या पार्श्वभूमीवर माजी नगराध्यक्ष श्री. साळगावकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. वीज वितरण कंपनीच्या ढिसाळ कारभाराचा फटका सामान्य नागरिकांना बसत आहे. शहरात केवळ लाईट जाण्याची समस्या नाही, तर डासांचा प्रादुर्भाव देखील मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यामुळे मलेरिया आणि डेंग्यूसारख्या आजारांची भीती निर्माण झाली आहे. त्यातच आता लाईट गेल्यामुळे अंधारात डासांचा उपद्रव अधिक वाढला आहे. ज्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. असह्य उष्णतेमुळे नागरिक आधीच त्रस्त आहेत. त्यात लाईटच्या ये-जामुळे पंखे व इतर उपकरणे बंद पडत आहेत. यामुळे लहान मुले, वृद्ध आणि आजारी व्यक्तींना अधिक त्रास सहन करावा लागत आहे.
नागरिकांना त्रास होत असताना आमदार आणि संबंधित अधिकारी काय करत आहेत ? जनतेच्या समस्यांकडे दुर्लक्ष करणे हे अत्यंत गंभीर आहे. या गंभीर परिस्थितीवर तातडीने तोडगा काढण्याची मागणी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी केली आहे.