बा देवा रामेश्वर नारायणा..सगळ्यांका सुखी ठेव, भला कर !

मालवणचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर-नारायण यांचा पालखी प्रदक्षिणा सोहळा उत्साहात
Edited by: कृष्णा ढोलम
Published on: October 27, 2022 21:30 PM
views 293  views

मालवण : मालवणचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर-नारायण यांचा पालखी प्रदक्षिणा सोहळा मालवणवासीयांच्या उपस्थितीत बुधवारी पार पडला. संपूर्ण बाजारपेठ विदयुत रोषणाई, आकर्षक रांगोळी विविध प्रकारचे देखावे करण्यात आले होते. फटाक्यांची आतषबाजीत भक्तिमय वातावणात हा पालखी सोहळा संपन्न झाला. रामेश्वर नारायणाची पालखी राजेश पारधी, बाबू धुरी यांनी फुलांची आरास करून सजवली होती. या पालखी सोहळ्यात मोठ्या संख्येने मालवणवासीय सहभागी झाले होते. 


मालवणची ग्रामदैवत श्री देव रामेश्वर- नारायण हे पालखीत बसून मालवण परिक्रमणेसाठी बाहेर पडतात. जिल्हा भरातून नागरिक उपस्थित राहून या सोहळ्याचा आनंद लुटतात. बुधवारी दुपारी एक  वाजण्याच्या सुमारास श्री देव रामेश्वर नारायण देवस्थानचे मानकरी श्री गावकर यांनी श्री देव रामेश्वर नारायणा समोर श्रीफळ ठेवून आणि मंदिराच्या गाभाऱ्यात "बा देवा रामेश्वर नारायणा, प्रतिवर्षाप्रमाणे तुझो पालखी सोहळो आज संपन्न होता हा, रीतीरिवाजा प्रमाणे ह्या पालखी सोहळ्याक सुरुवात होता हा, सगळ्यांका सुखी ठेव भला कर" अशा आशयाचे साकडे घालत ढोल ताशांच्या गजरात आणि सनाईच्या सुरात फटाक्यांची आतषबाजी करीत पालखी निघाली. पालखी जसजशी पुढे सरकत होती, तसतशी शेकडो भाविक भक्तगण या मिरवणुकीत सहभागी होत होते.


देऊळवाडा आडवण येथील श्री देवी सातेरीकडे विधिवत धार्मिक कार्यक्रम पार पाडून आडवण भागातून पायवाटेने तर शेत मळ्यातून पालखी वायरी येथील तानाजी नाका येथे निघाली. तानाजी नाका येथे पालखी आल्यानंतर वायरी ग्रामस्थांनी पालखीचे स्वागत केले. त्यानंतर वायरी भूतनाथ येथे श्री भूतनाथ देवी या आपल्या बहिणीची देवांनी भेट घेऊन तिला सांगणे केले. याठिकाणी भाविकांना दर्शन दिल्यानंतर पालखी वायरी मोरयाचा धोंडा येथे निघाली. 


मोरयाचा धोंडा याठिकाणी मच्छीमारांनी पालखीचे मोठ्या उत्साहात स्वागत केले. यावेळी मोरयाचा धोंडा, श्री देव दांडेश्वर, मक्रेबाग या किनारपट्टीवर मच्छिमारांनी पालखीच्या स्वागतासाठी पताके लावून, होड्या सजवून जय्यत तयारी केली होती. यावेळी किनारपट्टीवर फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. यावेळी पालखीच्या दर्शनासाठी मच्छिमार बांधव व भाविकांनी मोठी गर्दी केली होती. मोरयाचा धोंडा येथे मोरेश्वराच्या भेटीनंतर पालखी दांडी येथे दांडेश्वर मंदिराकडे थांबली. दांडेश्वराच्या भेटीनंतर मक्रेबाग येथे पालखी थांबली. यावेळी मक्रेश्वर येथे पूजेचे आयोजन तसेच वाळूचे मंदिर साकारण्यात आले होते. किनारपट्टीवर ठिकठिकाणी भाविकांसाठी शितपेयाची व्यवस्था करण्यात आली होती. 


बंदर जेटीवरून भाविकांना दर्शन देत पालखी किनाऱ्यावरून पुढे सरकत मेढा- राजकोट येथील श्री काळबादेवी मंदिरात विसावली. यावेळी रामेश्वर- नारायण या देवतांकडून काळबादेवीला सांगणे करण्यात आल्यानंतर पालखी भाविकांना दर्शन देण्यासाठी थांबली.  पालखी मेढा जोशी मांड येथे भाविकांना दर्शन देण्यासाठी थांबली. यावेळी फटाक्यांची जोरदार आतषबाजी करण्यात आली. यानंतर पालखी पुन्हा बंदर जेटी मार्गे बाजारपेठेकडे निघाली. सोमवार पेठ येथील रामेश्वर मांड येथे पालखी थांबली. पालखी बाजारपेठेत आल्याने देवांच्या दर्शनासाठी यावेळी भाविकांची मोठ्याप्रमाणात गर्दी उसळली होती.

रामेश्वर मांड येथे दोन तास पालखी थांबल्यानंतर बाजारपेठेतून पालखी परतीच्या प्रवासाला मार्गस्थ झाली. यावेळी व्यापारी व भाविकांना दर्शन देत पालखी भरड नाक्यावर आली असता रिक्षा व्यावसायिकांतर्फे पालखीचे स्वागत करण्यात आले. भरड येथे रिक्षा चालक मालक संघटना यांच्या वतीने सत्यनारायण पूजेच आयोजन करण्यात आले होते. भरड येथून पालखी पुढे सरकत पुन्हा देऊळवाडा येथे रामेश्वर- नारायण मंदिरात पोहचली. गाव प्रदक्षिणा करून दोन्ही देव पुन्हा आपल्या राऊळात विराजमान झाले. आमदार वैभव नाईक, माजी आमदार परशुराम उपरकर यांनीही या सोहळ्याला भेट देत नतमस्तक झाले. 


गेली दोन वर्षे कोरोनाच्या सावटाखाली  अनेक निर्बंधात हा पालखी सोहळा झाला होता. कोरोनाची महामारी संपल्यानंतर निर्बंध उठविण्यात आले. सर्व सण उत्सव मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले. त्यामुळे मालवणचा हा ऐतिहासिक सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. यानिमित्ताने लाखोंची उलाढाल मालवणच्या बाजारपेठेत झाली.