बॅ. नाथ पै सेवांगणच्या पाककला स्पर्धेत सहदेव साळगांवकर प्रथम !

पुरुषांसाठीच्या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
Edited by: ब्युरो
Published on: March 18, 2024 05:01 AM
views 95  views

मालवण : "सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच पुरुषांसाठी पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले, तेही महिला दिनानिमित्त ही खूप आनंदाची गोष्ट आहे. काही कामे केवळ स्त्रियांनी करायची आणि काही पुरुषांनी असे आपण ठरवून टाकतो. परंतु स्वयंपाकासारखी कला अवगत असणे आता पुरुषांनाही अत्यंत आवश्यक आहे. नवीन शहरांमध्ये आणि विशेषतः परदेशात शिक्षण अगर व्यवसाय करायचा असेल तर पुरुषांना स्वयंपाक करता येणे खूपच उपयुक्त ठरते. अशा स्पर्धेमधून पुरुषांना ही कला आत्मसात करण्यास प्रोत्साहन मिळेल. स्त्री पुरुष समतेच्या मार्गावर टाकलेले ते एक महत्त्वाचे पाऊल आहे. ही स्पर्धा आयोजित केल्याबद्दल मी सेवांगणचे अभिनंदन करते." असे उद्गार ख्यातनाम आहार तज्ञ डॉ. विनया बाड यांनी मालवण येथे काढले.

बॅ. नाथ पै सेवांगण, मालवण संचालित कौटुंबिक सल्ला केंद्र आणि महिला व बाल विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त पुरुषांसाठी पाककला स्पर्धा दि. १५ मार्च २०२४ रोजी संस्थेच्या दादा शिखरे सभागृहात संपन्न झाली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून त्या बोलत होत्या. उपस्थित सर्वांचे स्वागत करून पाककला स्पर्धेची सुरुवात करण्यात आली. स्पर्धकांनी बनवून आणलेले पदार्थ हे आरोग्यदायी, पौष्टिक व विविध प्रकार तसेच सर्व पदार्थांची चवही उत्तम असल्याचे प्रमाणपत्र स्पर्धेचे परीक्षक मा. सौ. तृप्ती राणे व मा. मेघा सावंत व डॉ. विनया बाड यांनी दिले. स्पर्धेला जिल्ह्यातून एकूण ३५ स्पर्धकांनी सहभाग दर्शविला. या पाककला स्पर्धेत प्रथम क्रमांक सहदेव साळगांवकर, द्वितीय क्रमांक कुणाल बांदेकर व तृतीय क्रमांक गौरव किनळेकर यांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व रोख रक्कम देवून अभिनंदन करण्यात आले. चंद्रकांत आचरेकर, रणजित परब, क्षितीज हुनारी, योगेश सावंत, ऋतुराज मालंडकर या पाच स्पर्धकांना उत्तेजनार्थ प्रमाणपत्र व रोख रक्कम देवून सर्वांचे अभिनंदन करण्यात आले. तसेच सहभागी सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देवून त्यांचे अभिनंदन करण्यात आले.

यावेळी संस्थेच्या महिला व बाल विकास समितीच्या कार्याध्यक्ष विणा म्हाडगुत, सदस्या श्वेता पेडणेकर, मृण्मयी खोबरेकर, मंगलताई परुळेकर, ज्योती तोरस्कर तसेच संस्थेचे अध्यक्ष ॲड. देवदत्त परुळेकर, कार्याध्यक्ष पद्मनाभ शिरोडकर, कार्यवाह श्री. लक्ष्मीकांत खोबरेकर, कोषाध्यक्ष शैलेश खांडाळेकर, व्यवस्थापक संजय आचरेकर व संस्थेचे सर्व कर्मचारी उपस्थित होते. या स्पर्धेला जयहिंद कॉलेज साळगावचे कार्यकारी अधिकारी प्रवीण केळुसकर व प्रा. टेरी डिसा यांचे अनमोल सहकार्य लाभले.

लोकेश तांडेल, देवबाग यांनी सर्व स्पर्धकांनी बनवून आणलेल्या पदार्थांची व्हिडिओ क्लिपचे संकलन करण्याची विशेष धुरा सांभाळली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अदिती कुडाळकर तर आभार प्रदर्शन वैष्णवी आचरेकर यांनी केले. स्पर्धकांनी बनवून आणलेल्या पदार्थांचा मनसोक्त आस्वाद घेवून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.