
मालवण : रामललांच्या 22 जानेवारी रोजी होणाऱ्या बहु प्रतिक्षित प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच्या निमित्ताने सर्व श्रीराम भक्तांनी आपापल्या घराघरात व गावच्या मंदिरात सण - उत्सव साजरा करावा असे विश्व हिंदू परिषद मालवण तर्फे आवाहन करण्यात आले आहे.
राम जन्मभूमीवर उभारण्यात येत असलेल्या प्रभू श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याला 22 जानेवारी रोजी दुपारी 12:20 ला सुरुवात होणार आहे. त्याचा दुपारी १ वाजता समारोप होईल. या कालावधीत मंदिरात पूजा, कीर्तन, महाआरती अशा धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करावे. तसेच घरात सण साजरा करावा. सायंकाळी दिवे लावून घरात मंगलमय वातावरण निर्माण करावे.
श्रीराम जन्मभूमी न्यासाचे कार्यकर्ते श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचे निमंत्रण घेऊन घरोघरी येत आहेत. त्यांचे सहृदय स्वागत करावे त्यांनी दिलेल्या निमंत्रण पत्रिका, श्री राम मंदिराचे प्रस्तावित छायाचित्र, आणि पवित्र अक्षतांचे पवित्र राखावे.
अयोध्येतील श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचे संपूर्ण जगभरात थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. या प्रक्षेपणामुळे मंगलमय सोहळा याची देही याची डोळा पाहण्याचे सर्वांना भाग्य लाभले असून याचाही तमाम श्रीराम भक्तांनी आनंद घ्यावा असेही आवाहन विश्व हिंदू परिषदेचे मालवण प्रखंड अध्यक्ष भाऊ सामंत, जिल्हा सह कार्यवाह संदीप बोडवे, प्रखंड मंत्री सुनील पोळ यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे.