
सावंतवाडी : श्री क्षेत्र उपपीठ गोवा, तिसवाडी, ओल्ड गोवा येथून जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी स्थापित रामानंद संप्रदायाच्या वतीने 'वसुंधरा पायी दिंडी २०२५' चे भव्य प्रस्थान झाले आहे. रामानंद संप्रदायाच्या उपपीठ गोवा पासून ते मुख्यपीठ श्रीक्षेत्र नाणीजधाम (रत्नागिरी) पर्यंत हजारो भाविक शेकडो किलोमीटरचा पायी प्रवास करत आहेत. गोव्यातून ही दिंडी सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल झाली असून पर्यावरण संरक्षणाचा संदेश कृतीतून दिला आहे.
ही पायी दिंडी केवळ एक धार्मिक यात्रा नसून ग्लोबल वॉर्मिंग सारख्या ज्वलंत पण दुर्लक्षित विषयावर प्रकाश टाकणारी पर्यावरणपूरक मोहीम आहे. दिंडीचे आयोजक त्यांच्या कृतीतून पर्यावरण संरक्षणाचा संदेश देत आहेत. हजारो भाविकांच्या सोयीसाठी खाणे-पिणे, राहणे, स्वच्छतागृहांची व्यवस्था करताना पर्यावरणाला कोणतीही हानी होणार नाही याची विशेष काळजी घेतली जात आहे. मागे कचरा राहणार नाही याची खबरदारी घेण्यासाठी विशेष सेवेकरी पथक दिंडीत सहभागी आहे. दिंडीसोबत टॉयलेट व्हॅन, पिण्याचे पाणी आणि स्वच्छतेसाठी पाणी घेऊन २ स्वतंत्र टँकर्स कायम सज्ज आहेत. या दिंडीच्या माध्यमातून दररोज वृक्षारोपण केले जात आहे. नुकत्याच घोषित झालेल्या सरकारी योजना 'एक पेड माँ के नाम' मध्येही रामानंद संप्रदायाने सक्रिय सहभाग घेतला असून, दिंडीदरम्यान शेकडोंच्या संख्येने वृक्ष लागवड करण्याचा मानस आहे.
ही दिंडी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने रस्त्याच्या एका बाजूने, एका रांगेत, एका तालात आणि लयीत, त्यांच्या सांप्रदायिक गजरावर मार्गक्रमण करत आहे. त्यांची वेशभूषा एकाच रंगसंगतीत असून, त्यांच्या शिस्तीमुळे ही दिंडी लक्ष वेधून घेत आहे. दिंडीत सहभागी भाविकांच्या आरोग्याची विशेष काळजी घेतली जात असून, त्यांना वेळच्यावेळी सकस आहार पुरवला जात आहे. तसेच, वैद्यकीय सेवा देण्यासाठी ॲम्ब्युलन्ससह एक वैद्यकीय पथकही दिंडीसोबत सेवा देत आहे. या दिंडीमध्ये फक्त मध्यमवयीनच नव्हे, तर युवा-युवती, महिला-पुरुष, सर्व वयोगटाचे आणि सर्व सामाजिक वर्गातील भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. उपपीठ गोवा सोबतच तेलंगणा उपपीठ, उत्तर महाराष्ट्र (नाशिक), मराठवाडा (परभणी), मुंबई उपपीठ (वसई), पश्चिम महाराष्ट्र (पुणे) व उपपीठ नागपूर अशा ७ उपपिठांहून देखील अशाच प्रकारे पायी दिंड्यांचे प्रस्थान झाले आहे. या वर्षी हे सलग तिसरे वर्ष आहे आणि त्यात नवीन २ दिंड्यांची भर पडली आहे. हे सातत्य आणि चिकाटी संस्थानाची विशेष बाब आहे. जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या २१ ऑक्टोबर २०२५ रोजी येणाऱ्या ५९ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने ही दिंडी नाणीजधाम येथे दाखल होईल. याच दिवशी मुख्यपीठावर दरवर्षी हा उत्सव साजरा केला जातो. जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणेने रामानंद संप्रदाय महामार्गावरील ॲम्ब्युलन्स सेवा, मरणोत्तर देहदान, अवयव दान, गरीब मुलांसाठी मोफत CBSE शिक्षण, मोफत वेदपाठशाळा, रक्तदान, व्यसनमुक्ती, आपत्कालीन सेवा आणि दुर्बळ घटक पुनर्वसन यांसारख्या अनेक समाजपयोगी उपक्रमांसाठी नेहमीच ओळखला जातो आणि त्यांचे समाजात विविध स्तरांवर कौतुक होत आहे. ही 'वसुंधरा पायी दिंडी' धर्म, पर्यावरण आणि समाजसेवा यांचा अनोखा संगम साधणारी असून, खऱ्या अर्थाने एक आगळीवेगळी पायी दिंडी ठरत आहे.