
सिंधुदुर्गनगरी : पर्यावरण दिना निमित्त भाजपा किसान मोर्चा मार्फत सिंधुदुर्ग जिल्ल्यात ९ जुन ते ९ जुले या एक महिन्याच्या कालावधीत पर्यावरण संवर्धनासाठी विविध उपक्रम राबवले जाणार आहेत. प्रत्येक शाळेमध्ये पाच मुलांमागे एक झाड देऊन त्याचे संगोपन करण्याची शाळांवर जबाबदारी दिली जाणार असून भाजपाचा कार्यकर्ता महिन्यातून एकदा भेट देऊन संवर्धनाचे काम करणार आहे. त्याचबरोबर प्लास्टीक बॉटल टाळण्यासाठी शाळांमधून जनजागृती कार्यशाळा घेतल्या जाणार आहेत. ग्रामीण भागातील गावांमध्ये प्लास्टीक गोळा करण्याचे काम व वृक्ष संवर्धनाचे काम केले जाणार आहे अशी माहिती भाजपा किसान मोर्चाच्या वतीने भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.
भाजपा किसान मोर्चा मार्फत सिंधुदुर्गनगरी येथे वसंत स्मृती भवन भाजपा जिल्हा कार्यालयामध्ये पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश सचिव तथा जिल्हा संयोजक राजन चिके प्रदेश उपाध्यक्ष डॉ. गणेश उर्फ भाई बांदकर, जिल्हाध्यक्ष उमेश सावंत, राजू राऊळ, गुरुनाथ पाटील, महेश संसारे, वैभव शेणई, महेश सावंत आदी उपस्थित होते.
यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष यांनी माहिती देताना सांगितले की, ५ जून हा जागतिक पर्यावरण दिन १४३ देशांमध्ये साजरा केला जातो, या पर्यावरण दिनाच्या निमित्ताने जगभर विविध उपक्रम राबवुन कार्यक्रम साजरे केले जातात. भाजपा जिल्हा किसान मोर्चाच्या वतीने सिंधुदुर्गनगरी येथील भाजपा कार्यालयाच्या परिसरात भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांच्या हस्ते ५ वृक्ष लागवड करुन पर्यावरण दिनाच्या विविध उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. गतवर्षी १२ हजार वृक्ष वाटप करण्यात आले होते. परंतू यावर्षी केवळ वृक्षवाटप नव्हे तर वृक्ष संवर्धनावर अधिक भर दिला जाणार आहे. त्यामुळे शाळा सुरा झाल्यानंतर ९ जून ते ९ जुलै या एक महिन्याच्या कालावधीमध्ये पर्यावरण दिना निमित्त विविध उपक्रम राबविले जाणार आहेत,
जिल्ल्यातील सर्व शाळांमधून हा उपक्रम राबवत असतांना ५ मुलांमागे १ झाड असे वृक्ष वाटप केले जाणार आहे. ही वृक्ष लागवड केल्यानंतर त्याच्या संगोपनाची सुद्धा काळजी घेतली जाणार असून त्या-त्या गावातील भाजपचा कार्यकर्ता दरमहिन्याला किमान एकदातरी शाळेला भेट देऊन वृक्ष लागवडीचे संगोपन केले जाते की नाही हे पाहणार आहे व ते स्वतः संगोपणाची जबाबदारी घेणार आहेत. त्याचबरोबर सर्व शाळांच्या माध्यमातून प्लास्टीक बॉटल टाळणे यासाठी जनजागृती केली जाणार आहे. प्लास्टीकच्या बॉलमधून नेले जाणारे पाणी बंद करुन अन्य बॉटलचा वापर करावा याचेही आवाहन केले जाणार आहे.
जिल्ह्यात मोठ्याप्रमाणात वृक्ष लागवड केली जाणार असून ही बुदा लागवड आकडेवारीत मोजण्यापेक्षा त्याचे संवर्धन कसे होईल याबाबतचे नियोजन केले जाणार आहे, जिल्ह्यातील प्रत्येक रेल्वे स्थानकाच्या परिसरामध्ये सुद्धा वृक्ष लागवड करुन त्याचे संवर्धन केले जाणार आहे, जिल्ह्यात शहरी भागामध्ये कचरा गोळा करणे, प्लास्टीग गोळा करणे याची व्यवस्था अनेक ठिकाणी केलेली आहे. परंतु ग्रामीण भागामध्ये ती व्यवस्था नसल्याने ग्रामीण भागातील गावांमध्ये शाळांच्या मार्फत प्लास्टीक पिशव्या, प्लास्टीक बॉटल गोळा करण्याचे काम विद्यार्थ्यांमार्फत व भाजपा कार्यकत्यांच्या माध्यमातून केले जाणार आहे. आणि पर्यावरण संवर्धनासाठी प्लास्टीकचा वापर टाळण्याचे आवाहन केले जाणार आहे.
वेंगुर्ला तालुक्यात व समुद्र किनारपट्टीच्या काही भागात कासव संवर्धनाचे काम केले जाते. हा एक पर्यावरण संवर्धनाचाच भाग असल्याने कासव संवर्धन करणाऱ्यांचा सत्कार भाजपा किसान मोर्चा मार्फत केला जाणार आहे. त्याचबरोबर कासव संवर्धनासाठी लागणारे साहित्य सुद्धा त्यांना दिले जाणार आहे. अशी माहिती भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी पत्रकार परिषदेत दिली. तसेच ९ जुन ते ९ जुलै या कालावधीमध्ये पर्यावरण संवर्धनासाठी विविध उपक्रम राबवताना २१ जून ला येणारा योग दिवस, २३ जुन ला मुखर्जी जयंती, २५ जुनला आणीबाणीचा काळा दिवस या दिवसांचे महत्व आणि माहिती लोकांना दिली जाणार आहे. अशा प्रकारे विविध उपक्रम राबविले जाणार असून पर्यावरण संवर्धनासाठी जिल्लधातील जनतेने पुढे यावे असे आवाहनही त्यांनी केले आहे.