
सावर्डे : कला संचालनालय महाराष्ट्र राज्य, मुंबई मुंबईच्या वतीने महाराष्ट्र राज्य कलाप्रदर्शनाचे आयोजन करण्यात येते.या प्रदर्शनासाठी व्यावसायिक या विभागामध्ये महाराष्ट्रातील अनेक चित्रकार व शिल्पकार यांचा सहभाग असतो. हे प्रदर्शन शासनामार्फत घेण्यात येत असून या प्रदर्शना मध्ये कलाकारांच्या कलाकृतीची निवड होणे हि खूप मोठी व महत्वाची गोष्ट असते.
कला संचालनालय महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या वतीने ६४ वे महाराष्ट्र राज्य कलाकार विभाग कला प्रदर्शन जहांगीर आर्ट गॅलरी मुंबई येथे ४ ते १० फेब्रुवारी दरम्यान भरविण्यात आले असून याचे उद्घाटन दिनांक ४ फेब्रुवारी २०२५ रोजी राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते करण्यात आले.
उच्च व तंत्र शिक्षण विभाग, कला संचालनालय महाराष्ट्र राज्य,मुंबई यांच्या वतीने आयोजित या प्रदर्शनामध्ये सह्याद्रि स्कूल ऑफ आर्ट चे माजी विद्यार्थी राकेश देवरुखकर, विक्रांत बोथरे,संदेश मोरे, मकरंद राणे, कौस्तुभ सुतार या विद्यार्थ्यांच्या कलाकार विभागात प्रदर्शना करीता निवड करण्यात आली आहे.
यामध्ये राकेश देवरुखकर यांना राज्यशासनाचा पुरस्कार आहे.हा पुरस्कार मिळण्याची त्यांची तिसरी वेळ असून त्यामुळे यापुढे त्यांना राज्यशासनाचा पुरस्कार मिळणार नाही हा पुरस्कार त्यांचा अंतिम असल्यामुळे त्यांचे खास कौतुक होत आहे. तसेच संदेश मोरे याला देखील राज्यशासनाचा पुरस्कार मिळाला आहे.राज्यातून ७८० कलाकृती आल्या होत्या. यातील १४८ कलाकृतीची प्रदर्शनासाठी निवड करण्यात आली.
यातील १५ चित्रकारांच्या कलाकृतींना राज्यपालांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.या पंधरा कलाकारांना रोख ५२०००/-रुपयाच पारितोषिक मिळाले आहे. त्यामध्ये राकेश देवरुखकर व संदेश मोरे यांचे नाव असून सह्याद्रि शिक्षण संस्थचे सह्याद्रि स्कूल ऑफ आर्ट या चित्र शिल्प कलामहाविद्यालयाच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
या प्रदर्शनात मांडण्यात आलेल्या सर्व कलाकृतींची राज्यपाल यांनी पाहणी करुन कलाकारांच्या कलाविष्काराचे कौतुक केले.
यावेळी आयोजित कार्यक्रमात व्यासपीठावर उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अप्पर सचिव बि .वेणू गोपाल रेड्डी, अभिमत विद्यापीठ कुलगुरु रजनीश कामत, कला संचालक संतोष क्षीरसागर, निरीक्षक संदीप डोंगरे आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रदर्शन मुंबईतील जहांगीर आर्ट गॅलरी येथे ५ ते १० फेब्रुवारी २०२५ अखेर सकाळी ११ ते सायं ७ वाजेपर्यंत रसिकांना पाहण्यासाठी खुले राहणार आहे. सह्याद्रि शिक्षण संस्थेचे कार्यध्यक्ष व संगमेश्वर -चिपळूण मतदार संघांचे आमदार शेखर निकम, संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब भुवड, सेक्रेटरीमहेश महाडिक, जेष्ठ चित्रकार शिल्पकार प्रा. प्रकाश अर्जुन राजेशिर्के, पूजाताई निकम, कलामहाविद्यालयाचे प्राचार्य. माणिक यादव यांनी सर्वांचे कौतुक व अभिनंदन केले आहे.