
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा उत्कर्ष मंडळ पिंपरी चिंचवड पुणे यांच्या तर्फे 'सिंधुदुर्ग भूषण' हा मानाचा पुरस्कार मालवणी भाषा अभ्यासक आणि लेखक डॉ. बाळकृष्ण रामचंद्र लळीत यांना १५ ऑगस्ट रोजी अकुर्डी येथे झालेल्या वार्षिक स्नेहसंमेलनात क्रिकेटपटू पटू व प्रशिक्षक पांडुरंग साळगांवकर तसेच मंडळाचे अध्यक्ष श्री अजय पाताडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
डॉ. बाळकृष्ण लळीत यांनी अध्यापन करता करता प्रचंड लेखन केले आहे. त्यांची जवळपास २२ पुस्तके प्रकाशित आहेत.त्यांनी अनेक चर्चासत्रे गाजवली आहेत.अनेक नियतकालिकातून त्यांचे लेखन प्रकाशित झाले आहे.७ मालवणी बोलीभाषा संमेलने त्यांच्या नावावर आहेत.अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी ते सन्मानित आहेत.अनेक साहित्य संमेलानांचे ते आयोजक सुद्धा राहिले आहेत. लळीत सरांनी दक्षिण कोकणच्या अध्यात्मिक रहस्याच्या शोधात हि सिरीज लिहून कोकणातील असंख्य देवी, देवता, सिमधडे यांची संशोधनात्म माहिती सर्वांसमोर ठेवली आणि अनेकांना पुन्हा गावाकडे बघण्याचा नवा दृष्टिकोन दिला.
सिंधुदुर्ग जिल्हा हा अगदी ब्रिटिश काळापासून संगीत,शिक्षण, कला यामध्ये आघाडीवर होता.अनेक कलाकार,नट, शिक्षण क्षेत्रातील नामवंत, संगीत क्षेत्रातील नामवंत या भागात होऊन गेले पण आजच्या काळात त्यांची नावे मात्र लुप्त झाली होती. त्यांनी केलेली साधना त्यांच्या बरोबर संपली होती आणि त्यांची नावेही काळाच्या पडद्याआड झाली होती. अशा वेळी लळीत सरांमधील संशोधक शांत रहाणे शक्यच नव्हते. त्यांनी अनेक माध्यमातून,प्रत्यक्ष त्यांच्या नातेवाईकांना, हितचिंतकांना भेटून माहिती जमा केली आणि हि अनमोल माहिती त्यांनी सिंधुरत्ने या पुस्तक रूपात जगासमोर मांडली.सध्या जरी सिंधुरत्ने चे दोन खंड उपलब्ध असले तरी भविष्यात किमान आठ ते दहा खंड वाचकांना उपलब्ध होतील.
सिंधुरत्ने हा डॉ. लळीत यांच्या आयुष्यातील मैलाचा दगड ठरणार आहे. सिंधुदुर्ग भूषण हा मानाचा पुरस्कार मिळाल्यामुळे डॉ. बाळकृष्ण लळीत यांचे सिंधुदुर्ग आणि महाराष्ट्रातील सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.