जिल्हा पत्रकार संघाचे पुरस्कार जाहीर

'कोकणसाद'च्या श्रीधर साळूंखेंना 'युवा पत्रकार पुरस्कार' !
Edited by: देवयानी वरसकर
Published on: December 29, 2023 18:06 PM
views 200  views

सिंधुदुर्गनगरी : जिल्हा पत्रकार संघामार्फत ६ जानेवारीच्या पत्रकार दिनानिमित्त देण्यात येणारे उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. नऊ जणांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. कोकणसाद LIVE व दै. कोकणसादचे प्रतिनिधी श्रीधर साळूंखे यांना उत्कृष्ट युवा पत्रकार पुरस्कार जाहीर झाला आहे. तर जेष्ठ पत्रकार पुरस्कार कणकवलीमधून चंद्रशेखर तांबट, मसुरे प्रतिनिधी दत्तप्रसाद पेडणेकर यांना ग्रामीण पत्रकार पुरस्कार तसेच उर्वरित उत्कृष्ट पत्रकार पुरस्स्कार सावंतवाडीमधून अवधूत पोईपकर, दोडामार्गमधून गणपत डांगी, सिंधुदुर्गनगरीमधून नंदकुमार आयरे, वेंगुर्लेमधून प्रथमेश गुरव, कुडाळमधून प्रमोद म्हाडगूत, देवगडमधून दयानंद मांगले यांची पुरस्कारासाठी निवड झाली आहे. पुरस्कार निवडीसाठी सिंधुदुर्गनगरी येथील पत्रकार भवनामध्ये जिल्हा पत्रकार संघाच्या कार्यकारिणीची बैठक झाली. 


त्यानंतर येथील पत्रकार कक्षात पत्रकार परिषद घेऊन जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर यांनी पुरस्कार जाहीर केले. यावेळी जिल्हा संघाच्या सचिव देवयानी वरसकर, उपाध्यक्ष बाळ खडपकर, सहसचिव महेश रावराणे, राजन नाईक, महेश सरनाईक,संतोष राऊळ उपस्थित होते. दरवर्षी ६ जानेवारीला पत्रकार दिन साजरा करण्यात येतो. या निमित्ताने उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार देऊन गौरव केला जातो. त्याप्रमाणे यावर्षीहि पुरस्कार निवडीसाठी तालुका संघ आणि मुख्यालय पत्रकार संघ यांच्याकडून पुरस्कारासाठी दोन पत्रकाराची शिफारस घेण्यात आली होती. त्यामधून प्रत्येकी एक याप्रमाणे नऊ जणांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. ६ जानेवारीला सिंधुदुर्गनगरी येथील आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मारक व पत्रकार भावनामध्ये पाहिलाच पत्रकार दिन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात मान्यवराच्या उपस्थितीमध्ये पुरस्कार वितरण केले जाणार आहे. या पत्रकार दिन कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून दैनिक लोकमतचे संपादक वसंत भोसले ,रेल्वे पोलीस आयुक्त तथा सिंधुदुर्गचे तत्कालीन पोलीस अधीक्षक डॉ रवींद्र शिसवे उपस्थित राहणार आहेत. तसेच उद्योगमंत्री उदय सामंत, शिक्षणमंत्री दीपक केसरकर, पालकमंत्री रवींद्र चव्हाण,आमदार नितेश राणे, आमदार वैभव नाईक उपस्थित  राहणार आहेत अशी माहिती उमेश तोरसकर यांनी दिली. जिल्ह्यतील सर्व पत्रकारांनी ६ जानेवारीला पत्रकार दिन कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन केले आहे .
   
दरम्यान, पत्रकाराच्या गुणवंत  व प्रविण्याप्राप्त पाल्याचा सत्कार समारंभ २० फेब्रिवारीला करण्यात येणार आहे.  २० फेब्रुवारीला पत्रकार भावनाचा पहिला वर्धापन दिन कार्यक्रम साजरा करण्यात येणार असून त्यावेळी पत्रकाराचे स्नेहसंमेलन व विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. या कार्यक्रमात मुलांचा सत्कार केला जाणार आहे अशी माहिती जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर यांनी दिली आहे.