ज्ञानदीप मंडळाचे २०२३ चे जिल्हास्तरीय पुरस्कार जाहीर !

Edited by: विनायक गांवस
Published on: April 09, 2023 18:36 PM
views 189  views

सावंतवाडी : येथील ज्ञानदीप शिक्षण विकास मंडळाचे सन २०२३ चे जिल्हास्तरीय मानाचे पुरस्कार रविवारी जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये जिल्ह्यातील सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, सहकार, पत्रकारीता, कला, संगीत, क्रीडा, कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना हे मानाचे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. संस्थापक अध्यक्ष वाय. पी. नाईक यांनी हे पुरस्कार जाहीर केले.


सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेली १७ वर्षे शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा, कृषी आणि अन्य क्षेत्रात विशेष कार्य करणाऱ्या व्यक्तींचा ज्ञानदीप मंडळातर्फे सातत्याने सन्मान केला जातो. निवड समितीने सेवानिवृत्त मुख्याध्यापक एस. आर. मांगले यांच्या अध्यक्षतेखाली यंदाचे पुरस्कार जाहीर केले. यावेळी जिल्हाभरातून आलेल्या विविध प्रस्तावांची छाननी करण्यात आली. त्यानंतर संस्थापक अध्यक्ष वाय. पी. नाईक यांनी सन २०२३ चे पुरस्कार जाहीर केले.

 

या पुरस्कार विजेत्यांमध्ये प्रकाश कानूरकर (कट्टा ता. मालवण - शैक्षणिक सेवा), प्रा. संतोष जोईल (फोंडाघाट - ता. कणकवली, सामाजिक व साहित्य सेवा), निलेश मोरजकर (बांदा, ता. सावंतवाडी - पत्रकारिता), उत्तम फोंडेकर (कुंभारमाठ - ता. मालवण - सेंद्रिय शेती व युवा शेतकरी), सीमा दीपक पंडित ( कास, ता - सावंतवाडी, शैक्षणिक सेवा), पांडुरंग विष्णू दळवी (वजराट, ता. वेंगुर्ला -शैक्षणिक सेवा) यांना यंदाचे पुरस्कार जाहीर करण्यात आले.


यावेळी निवड समितीचे एस. आर. मांगले, संस्थापक अध्यक्ष वाय. पी. नाईक, अध्यक्ष जावेद शेख, उपाध्यक्ष प्रा. रूपेश पाटील, सहसचिव विनायक गांवस, कार्याध्यक्ष निलेश पारकर, मंडळाचे सदस्य भरत गावडे, विठ्ठल कदम, प्रज्ञा मातोंडकर, रश्मी भाईडकर आदी उपस्थित होते.


या पुरस्काराचे स्वरूप कोल्हापुरी फेटा, शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व मानपत्र असे असून हे पुरस्कार एस. आर. मांगले, रश्मी भाईडकर व आर. व्ही. नारकर यांनी पुरस्कृत केलेले आहेत.

दरम्यान लवकरच पुरस्कार विजेत्यांचा ज्ञानदीप मंडळातर्फे पुरस्कार देऊन सत्कार करण्यात येणार असल्याचे निवड समितीने जाहीर केले. ज्ञानदीप मंडळाच्या गेल्या १७ वर्षातील शैक्षणिक, सामाजिक, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्याचे हे कार्य अनेकांना प्रेरणादायी असल्याचे निवड समिती अध्यक्ष श्री. मांगले यांनी सांगितले.