'संस्थानकालीन सावंतवाडीच्या आठवणी जागवा, अभिव्यक्त व्हा!

'कोमसाप'चा उपक्रम ; १० डिसेंबर रोजी आयोजन
Edited by: रुपेश पाटील
Published on: December 02, 2022 20:44 PM
views 202  views

सावंतवाडी : कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखा यांच्यावतीने 'संस्थानकालीन सावंतवाडी शहरातील जुन्या आठवणी जागवा आणि अभिव्यक्त व्हा!' हा उपक्रम शनिवारी १० डिसेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता श्रीराम वाचन मंदिर समोरील मोती तलावाच्या सेल्फी पॉईंट कट्ट्यावर होणार आहे,  अशी माहिती कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखेचे अध्यक्ष अॅड. संतोष सावंत, माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी दिली.

संस्थानकालीन पूर्वीची सुंदरवाडी अर्थात सावंतवाडी आणि सावंतवाडी शहरातील अनेक आठवणी जुन्या जाणत्या व्यक्तीने पाहिल्या आहेत, अनुभवल्या आहेत.  आता बदलती सावंतवाडी आणि या बदलत्या सावंतवाडीतील जुन्या आठवणींना उजाळा देण्याच्या दृष्टीने सावंतवाडी शहरातील जुन्या 'आठवणी जागवा आणि अभिव्यक्त व्हा!' हा उपक्रम राबवण्यात येत आहे.

सेल्फी पॉईंट येथील कट्ट्यावर सावंतवाडी काठावरची सायंकाळ अनुभवता यावी यासाठी सावंतवाडी शहराच्या जुन्या आठवणी जागवल्या जाणार आहेत. हा नाविन्यपूर्ण असा उपक्रम असून ज्यांनी सावंतवाडीतील जुन्या आठवणी, प्रसंग व अनुभवलेले सोनेरी क्षण असतील, त्यांनी या उपक्रमात सहभागी व्हावे व आपली नावे येत्या ८ डिसेंबर २०२२ पर्यंत व सचिव प्रा. प्रतिभा चव्हाण, सहसचिव राजू तावडे यांच्याकडे नोंदवावीत. जुन्या आठवणी व्यक्त होण्यासाठी काही ज्येष्ठ नागरिकांनी व साहित्यिकांनी आपली नावे नोंदवली आहेत. पाच मिनिटात सावंतवाडी शहरातील जुन्या आठवणी अनुभव कथन करायचे आहेत. जुन्या आठवणींचा उजाळा यानिमित्ताने होणार आहे. कार्यक्रम नियोजनासाठी घेतलेल्या बैठकीत माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर,  अध्यक्ष अॅड. संतोष सावंत, सचिव प्रतिभा चव्हाण, उपाध्यक्ष अभिमन्यू लोंढे, सहसचिव राजू तावडे, अॅड. नकुल पार्सेकर, प्रा. रुपेश पाटील, सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव आदी उपस्थित होते.

 १० डिसेंबर रोजी सायंकाळी सहा ते आठ या वेळेत श्रीराम वाचन मंदिर जवळील हा कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे. तरी मोठ्या संख्येने साहित्यप्रेमी, नागरिक, व्यापारी, विद्यार्थी, विविध संस्था आदींनी उपस्थित राहावे, असे आवाहन कोमसाप शाखेच्या वतीने करण्यात आले आहे.