
वेंगुर्ले : तुळस वेशिवाडीला लागून असलेल्या तुळस होडावडा सीमावर्ती भागात राहत असलेल्या परप्रांतीय चार ते पाच कुटुंबीयांचे उद्योग हे समाज विघातक तसेच देशहिताला बाधक असे असल्याने त्यामुळे याची योग्य ती दखल घेऊन त्यांची माहिती शासनाला द्यावी व गावातील वन्य जीवांची होणारी तस्करी रोखवी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे तुळस विभागीय अध्यक्ष अवधूत मराठे यांनी तुळस ग्रामपंचायत सरपंच यांच्याकडे निवेदनाद्वारे करत हा परप्रांतीयांचा विषय ग्रामसभेत चर्चेला येऊन सुद्धा त्यावर कोणतीही कार्यवाही झाली नसल्याने याकडे लक्ष वेधण्यासाठी २६ जानेवारी रोजी ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषण करणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
अवधूत मराठे यांनी दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, तुळस गावाच्या पूर्व भागात असणाऱ्या वेशीवाड़ीला लागून तुळस होडावडा या सीमावर्ती भागात प्रारप्रांतीय चार- पाच कुटुंबे राहतात. त्यांचे उद्योग हे समाज विघातक तसेच देशहिताला बाधक आहेत. दिनांक ८ डिसेंबर २०२३ रोजी तुळस बेतवाडी येथील डोंगरा मध्ये सप्तरंगी वनौषधी झाडाच्या मुळाची तस्करी करताना पाच कातकरी समाजाच्या लोकाना वनविभाग अधिकाऱ्यांनी पकडले तरी ही आदिवासी लोक गेली २ वर्ष एका इसमाच्या जमिनीमध्ये वास्तव्यात आहेत.
मागील ग्रामसभेत हा विषय आपण चर्चेला घेऊन सुद्धा यावर कोणतीही कार्यवाही केली नाही. तरी या अर्जाची दखल घेवून गावातील अशा लोकांचा शोध घेवून त्यांची माहिती शासनाला द्यावी व गावातील वन्यजीव उदा. कासव, मोर, सरपटणारे प्राणी, अजगर, वानर तसेच रान इकरे याची तस्करी रोखवी. या परप्रांतीयां पासून गावातील लोकाना धोका पोहोचला तर त्याची संपूर्ण जबाबदारी आपणावर राहील. तसेच तुळस गावातील डोंगर भागात असणाऱ्या शाळेतील मुले शाळा सुटल्यानंतर शाळेपासून घरी चालत जातात त्यांच्या जिविताला सुद्धा धोका आहे. त्यामुळे जे परप्रांतीय लोक गावामध्ये राहतात त्याची आधारकार्ड, फोटो, मूळ घराचा पत्ता आदी सर्व माहिती ग्रामपंचायत ने घ्यावी तसेच तुळस गाव हगणदारीमुक्त असून सुद्धा या लोकांनी शौचालय बाधलेले नाही. याबाबत ग्रामपंचायत तुळसला निवेदन देवून सुद्धा यावर कठलीही कार्यवाही कली नाही तरी या सर्व गोष्टींचा निषेध म्हणून व या बाबींकडे गांभीर्याने लक्ष देण्यासाठी आपण तुळस ग्रामपंचायत समोर उपोषणाला बसणार असल्याचे अवधूत मराठे यांनी निवेदनात म्हटले आहे.