साहित्य वाचन स्पर्धेत अविनाश पाटील - श्रावणी आरावंदेकर प्रथम

Edited by: विनायक गांवस
Published on: January 07, 2024 17:26 PM
views 131  views

सावंतवाडी : सिंधुदुर्ग साहित्य संघ आणि श्रीराम वाचन मंदिर आयोजित कविवर्य डॉ. वसंत सावंत स्मृती साहित्य वाचन स्पर्धेत खुल्या गटात कुडाळचा अविनाश पाटील यांनी तर विद्यार्थी गटात कुडाळ येथीलच श्रावणी आरावंदेकर हिने प्रथम क्रमांक मिळविला. ही स्पर्धा श्रीराम वाचन मंदिर सभागृहात झाली. स्पर्धेचे उदघाटन साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त साहित्यिक प्रा. प्रवीण बांदेकर यांच्या हस्ते ग्रंथ पूजनाने झाले. 


यावेळी साहित्य संघाचे अध्यक्ष लीलाधर घाडी, कार्याध्यक्ष विठ्ठल कदम, सचिव मनोहर परब, परीक्षक मधुकर मातोंडकर, प्रकाश तेंडोलकर यांच्या उपस्थित होते. स्पर्धेचा निकाल, खुला शिक्षक गट - प्रथम अविनाश पाटील (कुडाळ), द्वितीय - वंदना सावंत सावंतवाडी, तृतीय- महेश सावंत, सावंतवाडी, उत्तेजनार्थ - सेलेस्टीन शिरोडकर, माणगाव, सतीश धर्णे, कळणे. ९ ते १२ वी विद्यार्थी गट - प्रथम - श्रावणी श्रावणी आरावंदेकर, द्वितीय - तेजल देसाई, कळणे, तृतीय- आदेश खानोलकर, उत्तेजनार्थ - रेश्मा नाईक, श्रुती पोपकर, इन्सुली यांनी प्राप्त केला. मार्गदर्शन करताना प्रा. प्रवीण बांदेकर म्हणाले, सिंधुदुर्ग साहित्य संघ १९७२ मध्ये स्थापन झाले. या माध्यमातून विविध उपक्रम राबविले. विशेषतः कोजागरी कवी संमेलनाने अनेक कवींना प्रेरणा मिळाली. आजच्या काळात वाचनाची आवड कमी झाली आहे. अशावेळी साहित्य वाचन यासारख्या उपक्रमांची खरी गरज आहे. प्रसाद पावसकर यांनी साहित्य वाचन उपक्रमांची आज खरी गरज असल्याचे सांगत अशा उपक्रमांना वाचन मंदिरचे सहकार्य राहील असे सांगितले. यावेळी अध्यक्ष लीलाधर घाडी, कार्याध्यक्ष विठ्ठल कदम यांनीही मनोगत व्यक्त केले.

  

स्पर्धेचे बक्षीस वितरण श्रीराम वाचन मंदिरचे अध्यक्ष प्रसाद पावसकर, प्रा. प्रवीण बांदेकर, लीलाधर घाडी यांच्या हस्ते आणि सिंधुदुर्ग साहित्य संघाचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत झाले. प्रास्ताविक प्रा. श्वेतल परब यांनी तर सूत्रसंचालन प्रा. स्मिता खानोलकर यांनी केले. स्वागत प्रा. सुमेधा नाईक, राजेश मोंडकर यांनी केले. यावेळी प्रा. हर्षवर्धिनी जाधव, किशोर वालावलकर उपस्थित होते.