
जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविनी परोपकारे. संत सद्गुरु हे जगाच्या कल्याणा करिताच, अवतीर्ण झालेले असतात. प. पू. सद्गुरु सिद्धारूढ महाराजांचा महिमा अगाध आहे. ते साक्षात भगवान शंकराचे अवतार अशी भक्तांची धारणा आहे. त्यांचा जन्म कर्नाटकातील बीदर जिल्हयामधील चालकापूर या गावांत शके १७५८ चैत्र महिन्यात रामनवमीला झाला. गुरु शांतप्या व मलम्मा हे त्यांचे माता पिता. सिद्धारूढांचा अवतार जनकल्याणासाठीच आहे. सहज सुलभ साधनेने जनसामान्यांना भक्तीमार्ग दाखवावा, नामस्मरणाने अंतःकरण शुद्धी घडावी व त्यांच्या अंत:करणात आत्मज्ञानरूपी बीज पेरावे म्हणून प्रत्यक्ष भगवान शंकरांनी अवतार धारण केला.
त्यांचे उपास्य दैवत नंदिकेश्वर, कुलगुरु वीरभद्र स्वामींच्या सान्निध्यात घरात नित्यनेमाने भागवत, शिव- पुराण ग्रंथांचे वाचन श्रवण होत असे. सिद्धारुढांचे बालपण, बालक्रिडा करीत असताना दाखविलेले अनेक चमत्कार, वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षी केलेला गुरुशोध, सद्गुरु सेवा, व ज्ञानसाधना, सद्गुरु गजदंड स्वामीचा कृपाशिर्वाद घेऊन तीर्थयात्रेनिमित जडमुढांचा उध्दार हे त्यांच्या अवतार कार्याचे टप्पे होत. तीर्थयात्रेच्या दरम्यान त्यांनी असंख्य भक्तांना नामस्मरण, भक्ती सांगितली. ॐ नमः शिवाय या तारकमंत्राने मोक्ष प्राप्तीचा मार्ग दाखविला. नानाधिकाऱ्यांना ब्रम्हज्ञानाचा उपदेश केला. कित्येकांना रोगमुक्त केले. तीर्थभ्रमण दरम्यान अपार कष्ट सहन केले. अनंत लीलाधारी सार्वभौम चक्रवर्ती सिद्धारूढ महाराज अंगावर फक्त कौपिन धारण करीत. भूमातेच्या कुशीत झाेपावे. पाने अंतरिक्ष हेच पांघरूण, पर्जन्यराज त्यांना अंघोळ घाली. भक्तजन भोजन करवित. कित्येकदा भूमातेचा प्रसाद माती भक्षण करून रहायचे, असे सिद्धारूढ उन्मनी स्थितीत असायचे. दुष्ट वृत्तीचे लोक अनेकप्रकारे छळ करायचे ,पण त्यांची शांती कधीच ढळली नाही. कारण सिध्दारूढ महाराजांनी षड़ विकारांना जिंकले होते. त्यांची स्थिती त्रिगुणांच्याही पलीकडची होती. म्हणूनच सहा शत्रुंना जिंकून तिनही गुणांच्या पलीकडे सिध्दपदी आरूढ होणारा "सिद्धारूढ" हे नामाभिदान त्यांना प्राप्त झाले.
शेवटी कर्नाटकात हुबळी येथे आश्रम स्थापन करून अज्ञानी, दीन जनांच्या उध्दाराचे कार्य केले. त्यांनी मुमुक्षु जनांना नामस्मरण, भक्ती सांगितली. व सर्वत्र ज्ञान-भक्तीची अमृतवाहिनी अखंडितपणे प्रवाहित केली. श्रावण वद्य प्रतिपदा तिथी अर्थात २१-०८-१९२९ रोजी जगद्गुरु सिद्धारूढ स्वामीजी समाधिस्थ झाले. हुबळी नगरीच्या जनांचे महान भाग्य की त्यांना सिध्द्धारूढ स्वामींच्या रूपाने दिव्य रत्न प्राप्त झाले. आज मितिला हुबळी शिवाय गोकर्ण, कुमठा, बेंगलुरु, म्हैसूर, बीदर, चालकापूर, गुजरात, आंध्रप्रदेश, महाराष्ट्र ३० विविध ठिकाणी सिद्धारूढ मठांची स्थापना केलेली आहे. आपल्या गोमंतकामध्ये देखील २४ मठांची स्थापना करून भक्तजन जगद्गुरु श्री सिद्धारूढांच्या तत्वज्ञानाचा प्रचार आणी प्रसार करीत आहेत.
श्री सिद्धारूढ महास्वामीजींच्या जीवनावरील माहितीपटाचे प्रकाशन २१ आॅगस्टला सकाळी ११ वाजता प्रुडंट मिडियातर्फे रवींद्र भवन मडगाव इथं होत आहे. समर्थ सिद्धारूढ भक्तांसाठी निःसंशय हा एक सुवर्णक्षण आहे.