मंदिरात युवकाचा धिंगाणा ; दोघांवर हल्ला

Edited by: ब्युरो
Published on: July 03, 2024 14:32 PM
views 128  views

रत्नागिरी : रत्नागिरीतील बारा वाड्यांचे श्रद्धास्थान असलेल्या ग्रामदेवता भैरी मंदिरात कर्ला येथील इंजिनिअर असलेल्या युवकाने धिंगाणा घालून दोन जणांना जखमी केले. 

सोमवारी रात्री हा युवक पोलीस स्थानकात दाखल झाला होता. आपल्याला कोण तरी मारणार आहे, माझी तक्रार घ्या असे तो वारंवार पोलिसांना सांगत होता. त्यानंतर पोलिसांनी त्याची अदखलपात्र तक्रार नोंदवून घेत त्याला त्याची प्रत दिली. त्याने ती फाडून टाकत पोलीस स्थानकात रात्रभर धिंगाणा घातला. तो तक्रारदार असल्याने त्याच्याविरूद्ध कारवाई करणे शक्य नसल्याने पोलिसांनी त्याला घरी पाठवून दिले. 

मंगळवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास श्री देव भैरा मंदिरात दाखल झाला. भैरीसमोर नतमस्तक होत तो तब्बल तीन तास मंदिरात शांतपणे बसून होता. त्यानंतर सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास भैरीबुवाला पुन्हा पाया पडून तो गाभाऱ्यात जाऊ लागताच पुजारी चंदू गुरव यांनी त्यांना अटकाव केला. युवकाने चंदू गुरव यांच्या डोक्यात अंगाऱ्याचे भांडे मारले. त्यांना सोडविण्यासाठी मुलगा समीर गुरव पुढे आला. समीर गुरवच्या डोक्यात युवकाने घंटा मारली. देवळात कर्मचारी म्हणून काम करीत असलेल्या श्री.गावडे यांनाही कर्ला येथील युवकाने मारहाण केली. 

जखमी पुजारी चंदू गुरव, समीर गुरव यांना जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ग्रामदेवता मंदिरात येऊन कर्ला गावातील युवकाने तिघांना मारहाण केल्याने एकच खळबळ उडाली आहे. पोलीस निरीक्षक श्री.महेश तोरसकर यांनी ग्रामदेवता मंदिराला भेट दिली. पुजारी, कर्मचारी यांना मारहाण करणाऱ्या कर्ला येथील युवकावर शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पेशाने इंजिनिअर असलेला हा तरूण काही काळ जिल्ह्याबाहेर होता. परंतु गेले काही दिवस त्याला आपल्याला कोणीतरी मारहाण करणार असल्याचा भास होत असल्याचे सांगत तो धिंगाणा घालत आहे.