सरपंचांवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

Edited by: लवू परब
Published on: June 05, 2025 20:42 PM
views 1712  views

दोडामार्ग : कुंब्रल ग्रामपंचायतीत रमाई घरकुल योजनेची मागणी करण्याकरिता गेलेल्या महिलेस ती अनुसूचित जातीची असल्याचे माहिती असूनही हातवारे करून तिच्या मनात लज्जा निर्माण होईल असे कृत्य सरपंचाने केल्याची फिर्याद महिलेने येथील पोलिस ठाण्यात दिली. त्यानुसार सरपंच दादू बापू गोरे याच्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक हेमचंद्र खोपडे यांनी दिली.

पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी कुंब्रल गावातील एक महिला त्यांच्या घरासाठी रमाई घरकुल योजनेची मागणी करण्याकरिता बुधवारी ग्रामपंचायतीत गेली. यावेळी सरपंच दादू गोरे यांनी ती महिला मागासवर्गीय समाजाची असल्याचे माहित असूनही तिचे काम करू नका, तिचा काहीही अधिकार नाही असे बोलून हातवारे केले आणि अश्लील बोलून सार्वजनिक ठिकाणी महिलेच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. याबाबतची तक्रार संबंधित महिलेने येथील पोलीस ठाण्यात दिली. त्यावरून सरपंचाविरुद्ध अनुसूचित जाती, जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम ३(१)(आर), ३(१)(डब्ल्यू)(आयआय), ३(२)(व्हीए), भा. न्या. सं. ७५(१)(४), ७९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक हेमचंद्र खोपडे यांनी दिली.