
सिंधुदुर्गनगरी : कुडाळ येथील एसबीआय चे एटीएम फोन चोरी केल्या प्रकरणातील दोन्ही आरोपींचे जामीन अर्ज येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एच. बी. गायकवाड यांनी फेटाळला.
कुडाळ येथील एसबीआय बँकेचे एटीएम गॅस कटरच्या साह्याने फोडून 12 लाख 68 हजार रुपये चोरून नेत असताना पोलिसांनी एटीएम कॅश बॉक्स सह आरोपी अनिल बलोदा, वारिस जपरुद्दीन खान यांना अटक केलेली होती. तसेच अन्य आरोपी पळून गेले होते. कुडाळ पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 331(4), 305, 61,111(1), 112 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. आरोपी हे संघटित गुन्हेगार असून त्यांच्याविरुद्ध ठाणे, पालघर, पुणे, सिंधुदुर्ग, राजस्थान अशा वेगवेगळ्या ठिकाणी चोरी, जबरी चोरी, एटीएम फोडी असे अनेक गुन्हे दाखल आहेत. दोन्ही आरोपींनी जिल्हा व सत्र न्यायालयात जामीन मिळण्यासाठी अर्ज दाखल केलेला होता. या अर्जावर येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एच. बी. गायकवाड यांच्या न्यायालयात सुनावणी झाली.
सरकारतर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता गजानन तोडकरी यांनी आरोपींच्या जामीन अर्जास तीव्र हरकत घेऊन आरोपी हिस्ट्री शीटर असल्याबाबत कोर्टाच्या निदर्शनास आणून दिले. अरेबियन विरुद्ध चोरीचे अनेक गुन्हे असल्याने आरोपी जमीन मिळण्यास पात्र नाही ही बाब कोर्टाच्या निदर्शनास आणून दिली. सरकारी अभियोक्ता यांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने दोन्ही आरोपींचे जमीन अर्ज फेटाळून लावले.