
कुडाळ : कुडाळ येथील खरेदी विक्री संघाच्या परिसरात असलेल्या साधना बाजार जवळील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएमची मशीन फोडून त्यातील रोख रक्कम चोरणाऱ्या अनिल अम्मीलाल बलोदा (वय २५, रा. राज्यस्थान) व वारीस जफरूद्दीन खान (वय २६, राज्यस्थान) आरोपींना कुडाळ न्यायालयात जर केले असता १६ ऑगस्ट पर्यंत त्यांना पोलीस कोठडी देण्यात आली या चोरी प्रकरणी अजून काही जणांचा हात असण्याची शक्यता असून त्यांच्यासोबत आलेले दोन व्यक्ती हे पळून गेले आहेत त्यामुळे पोलीस कोठडीची मागणी पोलिसांनी केली होती पोलिसांच्या या मागणीनुसार पाच दिवसाची पोलीस कोठडी न्यायालयाने दिली सरकारी वकील हृदयनाथ चव्हाण यांनी पोलिसांची बाजू मांडली.
कुडाळ येथील साधना बाजार जवळील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएम मशीन फोडून त्यातील १२ लाख ६५ हजार ९०० रुपये चोरणाऱ्या अनिल बलोदा, वारीस खान यांना पोलिसांनी पकडून अटक केली व न्यायालयात हजर केले. यावेळी सरकारी पक्षातर्फे सरकारी वकील हृदयनाथ चव्हाण यांनी बाजू मांडली तर आरोपींच्या वतीने ॲड. मिहीर भणगे यांनी बाजू मांडली. यावेळी पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम उपस्थित होते.
सरकारी पक्षातर्फे ॲड. हृदयनाथ चव्हाण यांनी न्यायालयाला सांगितले की हे दोन्ही गुन्हेगार सराईत आहेत त्यांच्यासोबत अजून दोन आरोपी आहेत ते त्यामध्ये समशाद खान (वय ३५, रा. पनवेल, मुळ रा. उत्तर प्रदेश), व राजू आंबेकर (रा. विलेपार्ले, मुंबई) हे आरोपी (एमएच ०२- सीएच ८०८५) या वाहनातून पळून गेले त्यांचा शोध घेणे आवश्यक आहे तसेच त्यांनी आणलेले साहित्य त्यांच्यासोबत अजून काही व्यक्ती आहेत का? याची पडताळणी करणे गरजेचे आहे त्यांनी यापूर्वी कुठे अजून गुन्हे केले आहेत का याचीही पडताळणी होणे आवश्यक असून पोलीस तपासासाठी सात दिवस पोलीस कोठडीची मागणी त्यांनी केली तर यावेळी ॲड मिहीर भणगे यांनी सांगितले की, पोलिसांना मुद्देमाल हस्तगत झाला आहे. त्यामुळे त्यांना पोलीस कोठडी मिळू नये अशी मागणी केली.
झारखंड येथे केला गुन्हा
प्राथमिक तपासानुसार या आरोपींनी झारखंड येथे अशा प्रकारचा गुन्हा केला आहे हे उघड झाले असून त्यांनी रायगड तसेच बुलढाणा या ठिकाणी गुन्हा केला असल्याची शक्यता आहे. हे गुन्हे सुद्धा मोठ्या प्रमाणात वर रोकड लंपास केलेले आहेत त्यामुळे त्याचाही तपासासाठी उपयोग होणार आहे या ठिकाणी झालेला गुन्हा हा मुंबई येथे रचण्यात आला त्यामुळे मुंबईमधील काही लोक यांच्या टोळीत आहेत का? याची पडताळणी होणे गरजेचे आहे? आणि कोणाचे सहकार्य त्यांनी घेतले आहे का? हे पाहणे गरजेचे आहे यातील एका आरोपीला अशा गुन्ह्यांमध्ये शिक्षा सुद्धा झालेली उघड झाली आहे असे सरकारी पक्षातर्फे हृदयनाथ चव्हाण यांनी मांडले.
दरम्यान कुडाळ येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी या दोन्ही आरोपींना १६ ऑगस्ट पर्यंत पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.