महायुतीच्या उमेदवाराला किमान एक लाखाच मताधिक्य देणार..!

सावंतवाडी टर्मिनसबाबत आम्ही देखील आग्रही : राजन तेली
Edited by: विनायक गांवस
Published on: April 08, 2024 09:34 AM
views 387  views

सावंतवाडी : सावंतवाडी टर्मिनसबाबत आम्ही देखील आग्रही आहोत. या ठिकाणी टर्मिनससोबतच रेल्वे गाड्यांना थांबे व अन्य मुद्द्यांवर देखील आम्ही सकारात्मक असून त्याबाबतच्या कोकण रेल्वे प्रवासी संघटनेच्या लढ्याला आमचा शंभर टक्के पाठिंबा आहे. लवकरच याबाबत त्यांना न्याय मिळवून देण्यात येईल असा विश्वास माजी  राजन तेली यांनी व्यक्त केला. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या प्रचाराच्या नियोजनासाठी महायुतीतील सर्व पक्षांची एकत्रित समन्वय बैठक  झाली असून सर्वांनी एकत्रित प्रचार करून सावंतवाडी मतदारसंघातून महायुतीच्या उमेदवाराला किमान एक लाखाचे मताधिक्य देण्याचा निर्धार करण्यात आला असल्याची माहिती भाजपचे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ प्रमुख तथा माजी आमदार राजन तेली व शिवसेनेचे पदाधिकारी तथा सावंतवाडीचे माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत दिली. 

शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या सावंतवाडीतील निवासस्थानी महायुतीची संयुक्त बैठक सोमवारी सकाळी संपन्न झाली. यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अशोक दळवी, विधानसभा प्रमुख प्रेमानंद देसाई, सावंतवाडी तालुकाप्रमुख बबन राणे, दोडामार्ग तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष हेमंत उर्फ काका कुडाळकर, उदय भोसले,

भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष युवराज लखमराजे भोंसले, माजी नगराध्यक्ष संजू परब, जिल्हा बँक संचालक महेश सारंग, भाजप मंडल अध्यक्ष महेश धुरी, रवींद्र मडगावकर, गुरुनाथ पेडणेकर, अजय गोंदावळे, ॲड. निता कविटकर, विनायक दळवी, राजू निंबाळकर, राजन रेडकर, चंद्रकांत जाधव आदींसद पदाधिकारी उपस्थित होते.

केंद्रीय मंत्री नारायण राणे हे १२ एप्रिल रोजी सावंतवाडी तालुक्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांच्या दौऱ्याचे नियोजनही या समन्वय बैठकीत करण्यात आले. महायुतीचा उमेदवार अद्याप जाहीर झाला नसला तरीही वरिष्ठ पातळीवरून जो निर्णय घेण्यात येईल तो सर्वमान्य असेल व महायुतीचा जो उमेदवार घोषित करण्यात येईल त्याचा  महायुतीतील भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी अजित पवार गट व आर पी आय व मित्रपक्ष मिळून एकत्रित प्रचार करतील, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. तर विकास हाच महायुतीच्या प्रचाराचा मुद्दा असणार असून केंद्र शासन व राज्य शासनाच्या विविध योजना व सर्वसामान्यांसाठी केलेली कामे जनतेपर्यंत पोहोचवणार असल्याचे यावेळी राजन तेली म्हणाले. या मतदारसंघात निवडणूकीची तारीख ठरली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तारीखही निश्चित झाली आहे. तत्पूर्वी महायुतीचा उमेदवार जाहीर होणार आहे. मात्र, तोपर्यंत महायुतीच्या प्रचाराचे नियोजन करण्यासाठी  ही समन्वय बैठक होती अशी माहिती यावेळी राजन पोकळे यांनी दिली.