
दोडामार्ग : साटेली भेडशी येथील सहाय्यक अभियंता सतीश चव्हाण यांची अखेर बदली करण्यात आली आहे. मागील वर्षभरापासून या अधिकाऱ्याची बदली करण्याची मागणी दशक्रोशीतील ग्रामस्थ करत होते. शिवाय महावितरणच्या बैठकीत संतप्त ग्राहक व सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी अधीक्षक अभियंता यांना धारेवर धरत या अधिकाऱ्याच्या बदलीची मागणी केली होती. सतीश चव्हाण यांची बदली झाल्याने सर्व स्तरातून समाधान व्यक्त होत आहे.
दोडामार्ग तालुका हा अतिदुर्गम व डोंगराळ भाग आहे. महावितरणच्या साटेली भेडशी कार्यक्षेत्रात मोठा डोंगराळ, जंगलमय भाग येतो. त्यामुळे येथे एका कार्यतत्पर वीज अधिकाऱ्याची मागणी केली जात होती. मात्र येथे सहाय्यक अभियंता सतीश चव्हाण यांची बदली करण्यात आली होती. या अधिकाऱ्यांविरोधात वरिष्ठांकडे वारंवार तक्रारी जाऊ लागल्या. मात्र या तक्रारीनुसार अधिकाऱ्यावर कारवाई झाली नाही. त्यामुळे या दशक्रोशीतील ग्राहकांचा उद्रेक वाढतच होता. गतवर्षी झालेल्या महावितरणच्या संयुक्त बैठकीत या अधिकाऱ्याविरुद्ध ग्राहकांनी पाढाच वाचला होता.
मांगेली येथे १४ जून रोजी विद्युत भारीत तारांचा स्पर्श होऊन एका निष्पाप युवकाचा जीव गेला होता. यावेळी संतप्त ग्रामस्थांनी प्रशासनाला घेराओ घालत ठिय्या आंदोलन केले होते व सहाय्यक अभियंता सतीश चव्हाण यांच्यावर कारवाईची मागणी केली होती. तसेच त्यांची तात्काळ बदली करण्याची आग्रही मागणी केली. यावेळी बदली करण्याचे आश्वासन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले होते. त्यानंतर महावितरणच्या कार्यालयात ग्राहक व सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी या अधिकाऱ्याच्या बदलीची मागणी उचलून धरली. अधीक्षक अभियंता यांनी तात्काळ बदली करण्याचे आश्वासन दिल्याने संतप्त ग्राहक शांत झाले होते. अखेर सहा. अभियंता सतीश चव्हाण यांची बदली रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड येथे करण्यात आली आहे. याबाबत महावितरणचे मानव संसाधन वरिष्ठ व्यवस्थापक प्रणाली निमजे यांनी आदेश काढले आहेत. सतीश चव्हाण यांची बदली झाल्याने साटेली भेडशी दशक्रोशीतील ग्राहक समाधान व्यक्त करत आहेत.