
सिंधुदुर्गनगरी : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अनिल पाटील यांनी २६९- कुडाळ आणि २७०- सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयास भेट देऊन बैठक घेतली. या बैठकीत विधानसभा निवडणुकीचे नियोजन, गृह मतदान, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण, पोस्टल बॅलेट मतदान नियोजन, स्ट्राँग रूम आणि मतमोजणी कक्ष तसेच नामनिर्देशनबाबतच्या तयारीचा संपूर्ण आढावा घेतला.
श्री पाटील यांनी सावंतवाडी शहरातील २ मतदान केंद्रांना भेट देऊन मतदान केंद्रांवर पुरविण्यात येणाऱ्या सुविधांबाबत निर्देश दिले. यावेळी २७० -सावंतवाडी विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी हेमंत निकम, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी श्रीधर पाटील, ओंकार ओतारी आणि अमोर पवार उपस्थित होते.
कुडाळ उपविभागीय कार्यालयामध्ये देखील मतदान प्रक्रीयेचा संपूर्ण आढावा त्यांनी घेतला. येथील बैठकीनंतर श्री पाटील यांनी स्ट्राँगरुमला भेट देऊन मत मोजणी केंद्राची देखील पाहणी केली. यावेळी २६९- कुडाळ विधानसभा मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती ऐश्वर्या काळुशे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी विरसिंग वसावे, श्रीमती वर्षा झाल्टे, शितल जाधव उपस्थित होते.