
दोडामार्ग : आडाळी, देऊळवाडी, हरिजन वाडी ते कोसमवाडी रस्ता डांबरीकरण काम रखडल्याने 2 मे रोजी कमलाकर हरी सावंत यांनी आडाळी ग्रामपंचायत येथे पुकारलेले उपोषण आंदोलन अखेर कुडाळ येथील महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्थेचे कार्यकारी अभियंता यांच्या लेखी आश्वासनानंतर तूर्तास स्थगित करण्यात आले आहे.
कमलाकर हरी सावंत यानी सदर रस्त्यासाठी 2 मे रोजी उपोषणाचा इशारा दिल्यानंतर रस्त्याचे काम 2 मे पासुन सूरू करून 8 मे पर्यंत पूर्ण करण्यात येईल, असे लेखी पत्र आडाळी ग्रामस्थांच्या उपस्थितीत श्री. सावंत यांना कार्यकारी अभियंता (महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था) यानी श्री देवी माऊली मंदिर आडाळी येथे सोमवारी दिले. गेल्या पाच वर्षापासून रखडलेल्या रस्त्याच्या कामाला आजपासून सुरुवात होत असल्यामुळे ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे. ग्रामस्थांच्या लाभलेल्या अतुलनीय सहकार्याबद्दल श्री. सावंत यांनी आभार मानले आहेत.