
मालवण : विजेचा धक्का लागून गंभीर जखमी झालेल्या कुडाळ येथील कर्मचारी धनंजय फाले यांच्यावर गोवा बांबुळी येथे उपचार सुरु आहेत. आज कामगार नेते अशोक सावंत यांनी गोवा बांबुळी येथे जाऊन जखमी धनंजय यांची विचारपूस करत धीर दिला. तसेच नातेवाईकांशीही चर्चा केली.
दरम्यान, कंत्राटी विज कर्मचाऱ्यांना विज खांबावर चढण्याचे अधिकारी नसतानाही अधिकारी जबरदस्तीने चढवले जात आहे. याबाबत सोमवारी कंत्राटी कर्मचाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत पुढील भूमिका ठरणार असल्याचे अशोक सावंत यांनी सांगितले.
कुडाळ शहरातील गवळदेव जवळील अभिमन्यू हॉटेल समोरील विजवितरण कंपनीच्या पोलवर काम करीत असताना विजवितरण कंपनीचा कंत्राटी कर्मचारी धनंजय फाले (सध्या रा. पिंगुळी शेटकरवाडी मुळ रा. महादेवाचे केरवडे) हा विजेचा तीव्र धक्का लागून गंभीर जखमी झाला. या अपघाता नंतर त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. मात्र त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने अधिक उपचारासाठी त्याला गोवा बांबुळी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. सध्या आयसीयुत असलेल्या धनंजय याच्यावर उपचार सुरु आहेत. आज कामगार नेते अशोक सावंत यांनी गोवा बांबुळी येथे जाऊन उपचार घेत असलेल्या धनंजय याची विचारपूस करत नातेवाईकांशी चर्चा केली. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष संदीप बांदेकर, कणकवली विभाग जिल्हाध्यक्ष रुपेश पवार, उपाध्यक्ष रुपेश जाधव आदी उपस्थित होते.