
सावंतवाडी : ४० वर्षांपूर्वी आमदार निवासात काही डोळे जागत होते, पिंडाला कावळा शिवण्यासाठी लाल दिवा मागत होते. आज पालकमंत्री पदासाठी असेच काहीजण धडपडत आहेत. ''धड नांदता येईना, डोरल बांधता येईना, मोतराच्या पोराला 'पालक' सांगता येईना'' अशी वात्रटिका ज्येष्ठ साहित्यिक रामदास फुटाणे यांनी केली. तसेच हास्य कवी अशोक नायगावकर यांनी ''प्रेयसी गेल्यावर दुसरी मिळेपर्यंत सुतक पाळाव लागत. डॉक्टरांनी विचार काय होतं ? तर भाजपात जावस वाटतं'' असे सांगत उपस्थितांची दाद मिळवली. मुख्यमंत्र्यांचे माजी माहिती अधिकारी सतीश पाटणकर यांच्या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात रंगलेल्या 'धमाल काव्य संवाद' मैफलीत साहित्यिक रामदास फुटाणे, अशोक नायगावकर, प्रा. अशोक बागवे यांनी उपस्थितांना धमाल आनंदाची लयलूट करण्याची संधी दिली.
सिंधुदुर्गचे सुपुत्र, स्तंभलेखक मुख्यमंत्र्यांचे माजी माहिती अधिकारी सतीश पाटणकर यांच्या 'जाऊ तिथे खाऊ' आणि 'कोकण आयकॉन' या दोन पुस्तकांच प्रकाशन प्रजासत्ताक दिनी सावंतवाडीत झालं. यावेळी उपस्थित वात्रटिकाकार रामदास फुटाणे, ज्येष्ठ कवी अशोक नायगावकर, प्रा. अशोक बागवे यांच्यासह धमाल काव्य संवाद मैफल रंगली. मुलाखतकार सुधीर चित्ते यांनी त्यांच्याशी हा हलकाफुलका संवाद साधला. यावेळी राज्यातील राजकारणावर रामदास फुटाणेंना विचारल असता. ते म्हणाले, ''आमदार निवासात काही डोळे जागत होते, पिंडाला कावळा शिवण्यासाठी लाल दिवा मागत होते.'' ४० वर्षांपूर्वी आमदार निवासात तिकिटासाठी जमायचे. काहींना मंत्रीपदाची अपेक्षा असायची. आजची परिस्थिती बघता पालकमंत्री पदासाठी काहीजण धडपडत आहे. काही जिल्ह्यांना पालकमंत्री नाहीत. मराठवाड्यात मोतूर हा शब्द आहे. ''धड नांदता येईना, डोरल बांधता येईना, मोतराचे असल्याने पोराला 'पालक' सांगता येईना'' हीच अवस्था आहे. कोणत्या जिल्ह्याचा कोण पालकमंत्री आहे हे लोकांना सांगता येत नव्हते. तसेच लाल दिवा सचिवांच्या गाड्यांनाही असायचा. त्यामुळे लाल प्रकाश परिसरात असायचा. त्यावेळी एक वात्रटिका केली होती. ''वेश्यांच्या परिषदेत एक नवा प्रस्ताव आला. मंत्र्यांच्या गाडीमुळे लाल दिवा बदनाम झाला. इथून पुढे हिरवा दिवा लावूया, रेड लाईट एरियातून ग्रीन झोनमध्ये जाऊया ! '' आताच्या राजकारणावर बोलाताना श्री. फुटाणे पुढे म्हणाले, कहीही झालं तर सत्ता ही सत्ता आहे. महाभारतात सोन्याचे मुकूट होते आता बाबाच जॅकेट आहे. डोक्यावर आणि गळ्यात काय ठेवायचं हे मटेरीयल चेंज झालं. मात्र, सत्ताराजात काढीचाही बदल झाला नाही. सत्तेला मर्यादा नसते. त्याच्या अस्तित्वासाठी जो आड येईल त्याचा काटा काढला जातो. हा सत्तेचा नियम आहे असं मत श्री. फुटाणेंनी व्यक्त केलं. तसेच महाराष्ट्रातील अनेकांना वाटणाऱ्या गोष्टींत गौतम अदानीसारखा पैसा असावा आणि गौतमी पाटीलचा कार्यक्रम असावा या गोष्टी वाटत असताना एखादा साहित्यिक कार्यक्रम कोकणात होतो ही मराठी भाषेची खूप मोठी सेवा आहे. यासाठी सतिश पाटणकर यांना धन्यवाद द्यावे लागतील असे उद्गार काढले.
दुसरी प्रेयसी मिळेपर्यंत....!
रोज काहीतरी कानावर येत असत. सकाळ कोणत्या बातमीने होईल सांगता येत नाही. आपण कोणाला मत दिलं अन् निवडून कोण आलं ? हे पण कळत नाही. अशा गोंधळाच्या स्थितीत आपण लोक आहोत असं हास्य कवी अशोक नायगावकर म्हणाले. 'कशासाच, कशाशी काही संबंध नाही' या कवितेवर बोलताना, प्रेयसी गेल्याची बातमी आली. तेव्हा, प्रेयसी गेल्यावर किती दिवस सुतक पाळतात हे माहित नव्हतं. म्हणून, गुरूजींकडे गेलो तर ते म्हणाले ''दुसरी प्रेयसी मिळेपर्यंत'' पाळावच लागणार ! पुढे डॉक्टरांकडे गेलो तर त्यांनी खिशाला स्टेटसस्कोप लावला. काय होतंय ? विचारलं तर सारखं सारखं 'भाजपात जावस वाटतंय' अशी मिश्किल टीपणीही त्यांनी केली. कवितेपेक्षा मी मध्ये काय बोलतो हे महत्वाचे असते अस मानल जात. परवा तिळगुळ देण्यावरून आमच्याइथे मारामारी झाली. गोड बोलण्यावरून हा वाद झाला. आमचे काही कवी चांदण्यात टोपी घालून बसतात. अन् आमच्या कवीतेत बायकोही येत नाही, प्रेयसी दूरच. इतके नाजूक कवी आपल्याकडे आहेत. माझा चंद्राचा, प्रेयसीचा काही संबंध नाही. मी सुर्याचा माणूस आहे. दिवस ढकलण्याच काम करतो. अंधार पडण्यापूर्वी घरी परत जाण्याच काम करतो असं श्री. नायगावकर यांनी सांगितले.
वेशीतच राडा दिग्गजांचा...!
दरम्यान, डॉ. वसंत सावंत यांच्या संमेलनाची आठवण सांगत रामदास फुटाणे पुढे म्हणाले, ''जरा अंगी येता जातीचीच कळ, भुजातले बळ दर्शनविती. ढासळला आता सारा गावगाढा वेशीतच राडा दिग्गजांचा...!" ही कविता सादर करत श्री. फुटाणेंनी धर्म, जात व्यवस्थेवर मार्मिक भाष्य केल. नर आणि मादी या दोनच धर्म अन् जाती आपल्याकडे आहेत. धर्म जन्माला घातला त्यांचा उद्देश चांगला होता. मात्र, आज प्रचंड धर्म अन् जाती द्वेष बघायला मिळतो. तो वाढत चालला आहे. त्यामुळे व्यापून धर्म म्हणाला, ''मी काहींना पुजा दिली, काहींना प्रार्थना, मानवतेतची शिकवण दिली. यात माझं काय चुकलं ? तेव्हा जखमी जात म्हणाली व्यवसायाशी नातं जडलं तेच गळ्यात पडलं. माझं काय चुकलं ? तेव्हा ब्रम्ह म्हाणलं, जीव जन्माला घातले, ते उतले मातले. त्यात माझे काय चुकले ?'' माणूस जन्माला घालून चूक केली की काय ? असं ईश्वराला वाटत असेल अशी परिस्थिती आहे. दुसरीकडे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला असला तरी नेत्यांची भाषा ऐकून वाटत की हा महाराष्ट्र फार बदलण्याची गरज आहे असं मत व्यक्त केले. तर हा देश किर्तनान सुधारला नाही, तमाशानं बिघडला नाही असाही चिमटा काढला.
कवीनं समजून उमजून भोळं व्हायचं असतं !
दरम्यान, ''कवी जेव्हा प्राणातून बोलतो तेव्हा त्याला नसतं हसायचं. सगळं समजून उमजून भोळं व्हायचं असतं'' अशा काव्यपंक्तींनी ज्येष्ठ साहित्यिक प्रा.अशोक बागवे यांनी या सुरुवात केली. आपण मराठी आहोत हे सांगताना सुद्धा इंग्रजीत सांगतो. बरेचदा मराठीचा खून करतो. एका माणसानं मला तुम्हाला तिर्थरूप किती आहे ? असा प्रश्न विचारला होता. त्याला 'चिरंजीव' म्हणायचं होतं. पण, त्यानं तिर्थरूपांचा उद्धार केला. कवीला नरड नसतं त्याला गळा नसतो. कवी 'सा' लावत नाही 'आ' लावतो असं सांगत अशोक बागवे यांनी ''माझा मराठीचा बोल, वाजे काळजात खोल'' ही कविता सादर केली. तसेच आम्ही वनराईवर लिहीतो हे रोगराईवर लिहितात. कविता ही अंतर्मुख करणारी असते अस त्यांनी सांगितले.
शब्दांकन - विनायक गांवस, सावंतवाडी