
देवगड : देवगड तालुक्यातील विजयदुर्ग येथील विठ्ठल मंदिरात आषाढी हरिनाम सप्ताह समारोहन कार्यक्रम संपन्न झाला असून, आषाढी हरीनाम सप्ताहाचे समारोहन भव्य दिंडी काढून करण्यात आली. विठ्ठल मंदिरातून काढण्यात आलेली ही दिंडी गोपाळकृष्ण मंदिर, भानुदास मंदिर, विठ्ठलवाडी, राममंदिर, दत्तमंदिर, किल्ले मारूती मंदिर मार्गे चौपाटीवर नेण्यात आली. यावेळी संपूर्ण विजयदुर्ग ग्रामस्थ, विजयदुर्ग पंचक्रोशीतील विठ्ठल भक्त फार मोठ्या संख्येने सामील झाले होते. यंदा वाड्ये वठार प्रहरकरी मंडळींची दिंडी असल्याने या प्रहरकरी मंडळींमध्ये मोठा उत्साह होता.
विविध ठिकाणी बांधलेल्या दहीहंड्या फोडत दिंडीची सांगता विजयदुर्ग चौपाटीवर करण्यात आली. श्रीदेव विठ्ठल मंदिर समितीचे अध्यक्ष महेश बिडये यांच्या नियोजनात गेले 7 दिवस चाललेला दिवस रात्र अखंड हरीनाम सप्ताह मोठ्या उत्साहात संपन्न झाला.यावेळी महिलांनी आरती ओवाळून पालखीचे स्वागत केले. दरम्यान, प्रतिवर्षाप्रमाणे विठ्ठलवाडी आणि वाड्ये बंधू यांनी सर्व प्रहरकरी मंडळींसाठी सुदर्शन वाड्ये यांच्या घरानजीक आठ दहीहंड्या एकत्रित बांधल्या होत्या. येथील उत्साह पाहण्यासाठी शेकडो विठ्ठल भक्तांनी गर्दी केली होती. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल म्हणत या कार्यक्रमाची सात दिवसांनी सांगता करण्यात आली.