नागरिक - शासनामधील महत्वाचा दुवा म्हणजेच आशा : सभापती गणेश राणे

Edited by: निलेश ओरोसकर
Published on: March 26, 2026 18:01 PM
views 38  views

देवगड : नागरिक आणि शासनामधील आशाताई महत्त्वाचा दुवा असुन अशा या आशा स्वयंसेविकांनी कोविडच्या काळात स्वतःचा जीव धोक्यात घालुन सेवा बजावली आहे, ही बाब  कौतुकास्पद असल्याचे मत व्यक्त केले. माता मृत्यू आणि बाल मृत्यूना आळा घालणाऱ्या, उन्ह - वारा अन्‌ पावसाची तमा न बाळगता डोंगरदऱ्यांसह सर्वत्र घरोघरी पायी फिरून गरोदर मातांची काळजी घेणाऱ्या , आरोग्याबाबतची अनास्था दूर करणे, समाजात होणारे माता आणि बालमृत्यूचे प्रमाण कमी करणे व ते रोखणे आदी महत्त्वाची कामे आशा सेविका यांच्यावर शासनाने सोपविले आहेत. ती  कामे तत्परतेने आशा करत असल्याने त्यांचा गौरव व्हावा या दृष्टीने हा आशा दिन महत्त्वाचा दिवस असल्याचे पंचायत समिती देवगड सभापती गणेश राणे यांनी व्यक्त केले .

गुरुदक्षिणा सभागृह देवगड येथे आशा दिवस व जागतिक क्षयरोग दिन पंचायत समिती देवगड सभापती गणेश राणे , उपसभापती अमोल लोके , तालुका आरोग्य अधिकारी डॉ . अजित ढवळे व कक्ष अधिकारी संतोष बिर्जे यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच गटविकास अधिकारी अरुण चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला. 

या कार्यक्रमाचे उद्घाटन सभापती गणेश राणे व उपसभापती अमोल लोके यांच्या  हस्ते दिपप्रज्वलनाने व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करून करण्यात आले. यावेळी व्यासपिठावर तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अजित ढवळे, डॉ. रामानंद घोडके, कक्ष अधिकारी संतोष बिर्जे, आरोग्य विस्तार अधिकारी गंगुताई अडुळकर , तालुका समुह संघटक स्वप्निल झोरे, चित्तरंजन बाणे, आकाश सावंत, अक्षय पाचघरे आदी मान्यवर उपस्थित होते .

यावेळी उपसभापती अमोल लोके ,तालुका आरोग्य अधिकारी डॉ . अजित ढवळे, कक्ष अधिकारी संतोष बिर्जे, गटप्रवर्तक तृप्ती कांबळे, गटप्रवर्तक सोमन, आशा दुर्गा परब यांनी मनोगत व्यक्त करत आशां स्वयंसेविकांना शुभेच्छा दिल्या .

यानंतर क्षयरोग कार्यक्रमात चांगले काम केलेल्या आशा तसेच आरोग्य विषयक क्षेत्रात उत्तम कामगिरी करून  उत्कृष्ट काम केलेल्या आशा स्वयंसेविकांचा प्रशस्तिपत्र व सन्मानचिन्ह देउन गौरव करण्यात आला. तसेच आशाच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार तालुका समुह संघटक स्वप्निल झोरे यांनी मानले.