
सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्य सेवांचा कणा असलेल्या आशा वर्कर्स, गटप्रवर्तक तसेच महिला आरोग्य परिचारांना भेडसावणाऱ्या विविध समस्या व प्रलंबित मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा आशा वर्कर्स युनियन आणि सिंधुदुर्ग जिल्हा महिला परिचर युनियन यांच्या वतीने आज जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकारी यांना संयुक्त निवेदन सादर करण्यात आले.
यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा आशा वर्कर्स युनियन व सिंधुदुर्ग जिल्हा महिला परिचर युनियन संघटनेच्या अध्यक्षा कॉ. विजयाराणी पाटील, कॉ. प्रियांका तावडे, कॉ. वर्षा परब, कॉ. मानसी सावंत, कॉ. रक्षदा तळवणेकर आदी उपस्थित होत्या. सीईओ व आरोग्य अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात आशा व गटप्रवर्तक या सार्वजनिक आरोग्य व्यवस्था आणि नागरिकांमधील महत्त्वाचा दुवा म्हणून काम करत असताना त्यांना अनेक तांत्रिक, आर्थिक व मानसिक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे नमूद करण्यात आले. मात्रा अॅपमधील तांत्रिक त्रुटी, नेटवर्कअभावी होणाऱ्या अडचणी, अपुरे प्रशिक्षण, कुष्ठरोग सर्वेक्षणासाठी स्वयंसेवक न मिळणे, मोबाईल भत्ता, एटीपी नियोजनातील विरोधाभास, मानधन उशिरा मिळणे, VHNSC निधी खर्चाबाबतचा उलटा कारभार आदी प्रश्न तातडीने सोडवावेत, अशी मागणी करण्यात आली.
तसेच महिला आरोग्य परिचारांच्या निवेदनात अत्यल्प मानधन, कामाची स्पष्ट रूपरेषा नसणे, अतिरिक्त कामांची सक्ती, प्रवास व स्वच्छतेसाठी भत्ता नसणे, वेळेवर मानधन न मिळणे, अर्धवेळ नेमणूक असूनही दिवसभर काम करून घेणे आदी समस्यांचा उल्लेख करण्यात आला. राज्य शासनाने जाहीर केल्याप्रमाणे किमान मानधन, रजा, निवृत्तीवेतन, ग्रॅच्युईटी, वार्षिक युनिफॉर्म भत्ता व दिवाळी भेट देण्यासाठी पाठपुरावा करावा, अशी मागणी करण्यात आली.
या दोन्ही संघटनांनी वर्षातून किमान तीन वेळा जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांसोबत बैठकांचे आयोजन करून समस्या सोडवाव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली. मागण्या मान्य न झाल्यास पुढील आंदोलनाचा इशाराही यावेळी देण्यात आला.










