अतिवृष्टीमुळे सिंधुदुर्गातील नुकसानीचा आकडा वाढताच !

Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: July 13, 2024 07:42 AM
views 489  views

सिंधुदुर्गनगरी 

    सिंधुदुर्ग जिल्ह्यात शनिवार ६ जुलै रात्रीपासून रविवार दिवसभर झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली होती. या पूरस्थितीमुळे जिल्ह्यातील जनजीवन अक्षरशा विस्कळीत झाले होते. या सर्व स्थितीमुळे बरीच घरे पाण्याखाली जाऊन ती कोसळली आहेत. या सर्व पोटी जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ४ कोटी ३६ लाख ८४ हजार ७५० रुपयांचे नुकसान झाले आहे.तर एक व्यक्ती,४ जनावरे आणि ३ हाजार १९५ कोंबड्यांना आपला जीव गमवावा लागला आहे.

 दरम्यान या पोटी आतापर्यंत नुकसानग्रस्तांना पंधरा लाख दहा हजार रुपये एवढी नुकसान भरपाई वाढण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात जुलै च्या पहिल्या आठवड्यातच आठवडा संपता संपता  पावसाने जोरदार धडक दिली. शनिवार दिनांक ६ जुलै रोजी रात्रीपासून सिंधुदुर्ग जिल्ह्याला पावसाने अक्षरशः झोडपून काढले. ढगफुटीप्रमाणे कोसळलेल्या पावसामुळे रविवार दुपारपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली होती. जिल्ह्यातील कित्येक गावांचे संपर्क या पूरस्थितीमुळे तुटले होते. तर कित्येक संसार अक्षरशा पाण्याखाली गेले होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुमारे ४५३ पक्क्या तसेच कच्च्या घरांना याचा फटका  बसला यातील कित्येक घरे जमीन दोस्त झाली, तर  काही घरांची पडझड झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेल्या या नुकसानीमुळे घरे, गोठे,दुकाने, मांगर याचबरोबर जीवितहानीही झाली आहे. माणगाव येथील दत्ताराम भोई हे ६० वर्षीय गृहस्थ पुराच्या पाण्यात वाहून गेले आहेत त्यांचा शोध अद्यापही लागलेला नाही. तर तिन जनावरे यामध्ये दोन म्हैस आणि एक बैल अशांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर तब्बल 3 हजार 195 कोंबड्या  ही या पुराच्या पान्याच्या बळी पडल्या आहेत.

   या पुरामुळे जिल्ह्यातील 108 कुटुंबातील 407 एवढे लोक बाधित झाले होते. या सर्वांना पुराचे पाणी घरांमध्ये आल्याने सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले होते. यातील चार कुटुंबातील वीस व्यक्ती अद्यापही अन्य ठिकाणी आहेत, तर ज्यांची घरे पूर्ण उध्वस्त झाली आहेत अशांनी शेजारी व नातेवाईक यांचा आसरा घेतला आहे. 

   सुमारे साडेचार कोटीचे नुकसान 

  सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेल्या पूरस्थितीमुळे जिल्ह्यातील 12 पक्की घरे पूर्णतः कोसळल्याने यापोटी एक कोटी 59 लाख आठ हजार रुपये एवढे नुकसान झाले. तर पूर्णतः कच्चे घर एक पडल्याने यापोटी 90 हजार रुपये एवढे नुकसान, ३२२ एवढी पक्की घरे अंशतः पडल्याने या पोटी दोन कोटी 28 लाख 64 हजार 640 रुपये एवढे नुकसान झाले आहे, तर 118 कच्ची घरे अंशता कोसळल्याने या पोटी 20 लाख 24 हजार 515 रुपये एवढे नुकसान झाले आहे. तर पाच गोटे कोसळल्याने या पोटी 61 हजार पाचशे पंचवीस रुपये एवढे नुकसान त्याचबरोबर 79 दुकानांची पडझड झाली असून, या पोटी 74 लाख 96 हजार 470 रुपये एवढे नुकसान झाले आहे. तर 16 मांगर कोसळले असून या पोटी सहा लाख सहा हजार एवढे नुकसान झाले आहे. 

   सिंधुदुर्ग जिल्ह्यातील या अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे अजूनही काही घरांची पडझड होत आहे. त्याचे पंचनामे करण्याची प्रक्रिया अजूनही सुरू आहे. त्यामुळे नुकसानीचा आकडा अजूनही वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान पुढील चार दिवस सिंधुदुर्ग जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला असून, जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता मुंबई हवामान विभागाने वर्तवली आहे.

    २९ लाख रुपयांचे वाटप 

जिल्ह्यात साडेचार कोटी रुपयांपेक्षा जास्त नुकसान झाले आहे. या पोटी आतापर्यंत झालेल्या जनावरे व कोंबड्या यांच्या नुकसानी पोटी १ लाख २० हजार रुपयांचे वाटप संबंधितांना करण्यात आले आहे. तर  घरे,गो, मांगर, दुकाने आदींच्या नुकसानी पोटी तात्काळ मदत म्हणून ६ लाख ६ हजार रुपये एवढी करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. तसेच कपडे व घरगुती साहित्य खरेदी करण्यासाठी प्रति कुटुंब 5000 रुपये प्रमाणे 13 लाख 90 हजार रुपये एवढी रक्कम वाटप करण्यात आली आहे.