राज ठाकरे आक्रमक झाल्यानेच आ. नाईकांना मुंबई-गोवा महामार्गाचा पुळका

मनसेच्या अमित इब्रामपूरकर यांची टीका*
Edited by: कृष्णा ढोलम
Published on: August 16, 2023 20:05 PM
views 191  views

मालवण : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेत रखडलेल्या महामार्गाला कोकणातील सर्व लोकप्रतिनिधी निष्क्रिय असून तेच जबाबदार असल्याचे आजच्या निर्धार मेळाव्यात सांगितले. यामुळेच आम.वैभव नाईक यांना आता मुंबई गोवा महामार्गाच्या प्रश्नाबाबत जाग आणि पुळका आला असल्याची बोचरी टीका मनसेच्या अमित इब्रामपूरकर यांनी केली आहे.

यापूर्वी मनसे नेते परशुराम उपरकर यांनी सातत्याने मुंबई गोवा महामार्गाच्या दुर्दशेबद्दल आवाज उठवला होता. मुंबईत उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. नवीन राष्ट्रीय महामार्ग झाल्यानंतर त्यावर पडलेले खड्डे यावर आवाज उठवला होता. प्रशासकीय पातळीवर राष्ट्रीय रस्ते प्राधिकरणाने राष्ट्रीय महामार्ग करताना रस्त्याच्या दोन्ही बाजूला वृक्ष लागवड, मराठीत दिशादर्शक फलक, दर एक किलोमीटर भागामध्ये महिला व पुरुषांसाठी स्वच्छतागृह, अपघाता वेळी ॲम्बुलन्स सुविधा, ट्रामा केअर सेंटर, महिलांसाठी मोफत स्तनपानगृह २४ तास टोइंग सुविधा याची उभारणी करावी.

हे नियम प्रशासनासमोर आणले. ते पूर्ण करा यासाठी मनसेच्यावतीने सातत्याने मागणी केली. १६ तारीखला मनसे पनवेल येथे निर्धार मेळावा घेणार आणि राज ठाकरे आक्रमक भूमिका घेणार यामुळेच भीतीपोटी बांधकाम मंत्री रायगड जिल्ह्यात येऊन मुंबई गोवा महामार्गाची पाहणी करत आहेत व इतर मंत्र्यांप्रमाणे गणेश चतुर्थीपूर्वी एक लेन सुरू होईल अशी वार्षिक घोषणा करत आहेत. यावर वैभव नाईक मंत्र्यांवर टीका करत आहेत. दुसरीकडे उपरकरांनी गेली  पाच सहा वर्षे सातत्याने मुंबई गोवा महामार्गाच्या दुर्दशेबद्दल आवाज उठवताना आमदार वैभव नाईक झोपले होते का? राज ठाकरे यांनी  सर्वच लोकप्रतिनिधी निष्क्रिय आहेत असे म्हटल्यावर आम.वैभव नाईक मंत्र्यांवर टीका करत आहेत असे इब्रामपूरकर यांनी म्हटले आहे.