
कणकवली : कलमठ येथील रस्ता व साईटपट्टी दुरुस्तीचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याबाबत शिवसेना उबाठा पक्षाच्या युवासेनेचे कलमठ शहरप्रमुख तथा ग्रा.पं.सदस्य धीरज मेस्त्री यांनी गटविकास अधिकारी व कलमठ ग्रा.पं. ग्रामविकास अधिकारी यांच्याकडे तक्रार केली होती. त्यांच्या तक्रारीची प्रशासनाने दखल घेत ज्या ठिकाणी रस्ता व साईटपट्टीचे काम निकृष्ट दर्जाचे झाले त्याठिकाणी दुरुस्ती करावी, अशी ताकीद प्रशासासने ठेकेदाराला दिली होती. त्यानुसार ठेकेदाराने दुरुस्तीचे काम पुन्हा सुरू केले.
कलमठ हद्दीत गॅस पाइपलाइन टाकण्यासाठी रस्ता व साईटपट्टीलगत खोदकाम केले होते. खोदकाम केलेल्या ठिकाणी रस्ता व साईटपट्टी दुरुस्तीसाठी संबंधित कंपनीने ग्रा.पं.ला निधी दिला. दुरुस्तीचे काम ग्रा.पं.प्रशासनाने ठेकेदाराला दिले होते. मात्र, त्याने सदर काम निकृष्ट दर्जाचे केल्याने त्याचा फटका वाहनचालकांसह नागरिकांना बसत होता. दोन दिवसांपूर्वी कलमठ-बिडयेवाडी येथे साईटपट्टीवर डंबर रुतल्याचा प्रकार घडला होता.
याबाबत धीरज मेस्त्री यांनी ग्रामविकास अधिकारी आणि पंचायत समिती कणकवली यांच्याकडे लेखी निवेदन देत यासंदर्भात तात्काळ चौकशी व योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली होती.