
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गनगरी पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी ऑपरेशन ऑल आउट अंतर्गत कसाल येथे महाराष्ट्र राज्य दारूबंदी कायद्यांतर्गत केलेल्या कारवाईत कसाल तेलीवडी येथील टाकलेल्या धाडित तब्बल ९९ हजार ६४८ रुपयांची दारू जप्त केली आहे. तर अवैधरित्या दारू बाळगल्या प्रकरणी ज्ञानेश्वर सहदेव कामतेकर यांच्या विरोधात सिंधुदुर्गनगरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा पोलिस अधीक्षकांनी अवैध धंद्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यात आज सर्व पोलिस ठाण्यांना आपल्या हद्दीत ऑपरेशन ऑल आउट राबविण्याच्या सूचना पोलिस प्रशासनाने दिल्या होत्या. त्यानुसार आज सायंकाळी ५:४५ वाजता सिंधुदुर्गनगरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कसाल तेलीवाडी येथील ज्ञानेश्वर सहदेव का यांच्या घरावर छापा टाकून तपासणी केली असता घरातील मागील पडवी मध्ये गोवा बनावटीच्या विविध प्रकारच्या दारूचे एकूण ३५ बॉक्स आढळून आले. याची किंमत ९९ हजार ६४८ एवढी आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात गोवा बनावटीची दारू स्वतः जवळ बाळगल्या प्रकरणी ज्ञानेश्वर कामतेकर यांच्या विरोधात सिंधुदुर्गनगरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच तो दारुसाठाही जप्त करण्यात आला आहे. याबाबत अधिक तपास महिला पोलिस हेड कॉन्स्टेबल के व्ही नागरगोजे करत आहेत.