
कुडाळ : मीरा-भाईंदरमधील मोर्चा हा कुठल्या पक्षाचा नसून मराठी अजेंडासाठीचा मोर्चा होय. मात्र, सत्ताधारी पक्षाने मराठी माणसाचे उच्चाटन करायचा डाव मांडला आहे, असा आरोप खासदार अरविंद सावंत यांनी केला आहे.
पहाटे तीन-साडेतीन वाजता कार्यकर्त्यांना अटक केली म्हणजे ही तर आणीबाणी आहे, अशी थेट टीका खासदार अरविंद सावंत यांनी सरकारवर केली आहे. भाजपने संविधान हत्या दिन साजरा केला. मात्र, भाजप रोज संविधानाची हत्या करते. राज्यात नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषदेच्या निवडणुका घेतल्या नाही हे संविधानाची हत्या की संविधानाचा सन्मान यांचे उत्तर द्यावे. ही लोकशाहीच्या मुळावर येणारी लोक आहेत. पहलगाम हल्ला विसरायचा हा त्यांचा मूळ अजेंडा आहे, असाही आरोप खासदार अरविंद सावंत यांनी कुडाळ येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला.
महाराष्ट्राने आधी हिंदीला विरोध केला नाही. हिंदी बोलतो म्हणून कधी मारले नाही. मग आताच का? हे सर्व येणाऱ्या पालिका आणि बिहारमधील निवडणुकीसाठी आहे. सुशांतसिंह या कलावंताने आत्महत्या केली. बिहारच्या निवडणुकीत भाजपने त्याचा फोटो लावून प्रचार केला. “तुम्हे नही भुलेंगे, काय संबंध होता? असा प्रश्न खासदार सावंत यांनी उपस्थित केला.
खासदार निशिकांत दुबे हे काल काय म्हणाले? महाराष्टात काय आहे? आम्ही उबाठा तेच म्हणतोय, महाराष्ट्रातून उद्योगधंदे, व्यवसाय गुजरातला पळविण्यात आले. राज्यातील सगळे उद्योग गुजरातला गेले. आज झारखंडच्या खासदारानी मराठी माणसाला तुमच्याकडे काय आहे ? हे विचारले. आमच्या पैशावर जगता, हा माज भाजपच्या खासदाराला आला कुठून? चिड येत नाही मराठी माणसाला! असा संतप्त सवाल अरविंद सावंत यांनी करताना भाजप ही लाचारांची फौज आहे. भाजपच्या खासदाराने मराठी माणसावर टीका केली ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विचारा, मिंध्यांना विचारा! त्यांना हे लागले की नाही लागले.
मराठी भाषेसाठी काढण्यात येणाऱ्या मोर्चाला परवानगी कशाला हवी? मराठी भाषेला विरोध कारणासाठी सगळे एकवटतात. मात्र, आम्ही जातीपातीत विखुरलेले आहोत. त्यामुळे खासदार निशिकांत दुबे यांच्यासारखी माणसे बोलतात. अशांना आपणच दणका द्यायला हवा, असे खासदार अरविंद सावंत यावेळी म्हणाले. यावेळी उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, तालुकाप्रमुख राजन नाईक, बबन बोभाटे, युवासेना प्रमुख मंदार शिरसाट अतुल बंगे, कृष्णा धुरी, संदीप महाडेश्वर, गुरुनाथ गडकर, गंगाराम सडवेलकर, अमित राणे, बंड्या कोरगावकर, धीरेंद्र चव्हाण, नितीन राऊळ आदी उपस्थित होते.