
वैभववाडी : तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात अर्जुन रावराणे विद्यालयाने यश संपादन केले आहे.माध्यमिक गटात प्रतिकृती स्पर्धेत सिद्धेश भंडारी तर निबंध स्पर्धेत शिवानी फुटकने प्रथम क्रमांक पटकाविला आहे.
नेर्ले–तिरवडे येथील छत्रपती शिवाजी विद्यालयात दि. ९ व १० डिसेंबर रोजी तालुकास्तरीय ५३ वे विज्ञान प्रदर्शन पार पडले. यामध्ये अर्जुन रावराणे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी केली आहे. तालुक्यातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी विज्ञानाधारित प्रतिकृती व निबंध स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. प्राथमिक गटातील प्रतिकृती स्पर्धेत अन्मय अमित शिंदे याच्या ‘स्मार्ट बूट’ या अभिनव प्रतिकृतीस द्वितीय क्रमांक मिळाला. तर माध्यमिक गटात सिद्धेश भंडारी याच्या ‘नेत्र रक्षक पटल’ या उपयुक्त व सर्जनशील प्रतिकृतीने प्रथम क्रमांक पटकावला.
निबंध स्पर्धेतही विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत सर्वांचे कौतुक मिळवले. प्राथमिक गटात प्रांजल धनराज हत्तुरे हिने तृतीय क्रमांक तर माध्यमिक गटात शिवानी रत्नाकर फुटक हिने प्रभावी लेखनातून प्रथम क्रमांक मिळवत विद्यालयाचा मान उंचावला.या यशस्वी विद्यार्थ्यांना एस.व्ही. भोसले, एस.ए. सबनिस, पी.पी. सावंत, पी.बी. पवार, व्ही.एस. मरळकर, एम.एस. चोरगे व वाय.आर. चव्हाण या शिक्षकांनी मार्गदर्शन केले.विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे आणि मुख्याध्यापक बी.एस. नादकर यांनी विद्यार्थ्यांचे तसेच मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन करून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमास शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.










