
दोडामार्ग : दोडामार्ग तालुक्यातील शिक्षण व्यवस्थेला मोठा धक्का देणारा आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांवर थेट अन्याय करणारा जीआर जाहीर करण्यात आला आहे. कमी पटसंख्या हे कारण पुढे करत झोळंबे, आयी, घोटगेवाडी, उसप आणि मांगेली येथील माध्यमिक शाळा बंद करून विद्यार्थ्यांना इतरत्र समायोजित करण्याचे आदेश शिक्षणाधिकारी यांनी गटशिक्षणाधिकारी दोडामार्ग यांना दिले असल्याची माहिती काॅंग्रेस दोडामार्ग तालुकाध्यक्ष बाबू नाईक यांनी दिली आहे.
या निर्णयामुळे दुर्गम भागातील मुलांचे शिक्षण अक्षरशः अडथळ्यात येणार असून त्यांच्या शैक्षणिक भवितव्याला कायमची गंडांतर निर्माण होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे. शाळा बंद करण्याऐवजी ग्रामीण भागात शैक्षणिक सुविधा वाढवल्या पाहिजेत, अशी त्यांची मागणी आहे. दरम्यान, दोडामार्ग तालुका काँग्रेसचे शिष्टमंडळ गटशिक्षणाधिकाऱ्यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या कार्यालयात पोहोचले असता, ते कुडाळ येथे गेल्याची माहिती मिळाली. उपस्थित अधिकारी श्री. शेट्ये यांनी संबंधित आदेश कार्यालयात अद्याप प्राप्त झाले नसल्याचे सांगितले. ही भूमिका समाधानकारक नसल्याने तालुकाध्यक्ष बाबू गवस यांनी थेट गटशिक्षणाधिकारी नदाफ यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून तीव्र नाराजी व्यक्त केली. यावेळी बाळा धाऊसकर व रॉकी फर्नांडिस उपस्थित होते.
तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या हक्कांवर गदा येऊ नये, ग्रामीण भागाचे शिक्षण वाचवावे, या मागण्यांसाठी काँग्रेस आता आक्रमक भूमिकेत जाणार आहे. अन्यायकारक जीआर तातडीने रद्द न झाल्यास तालुक्यातील जनतेला एकत्रित करून जोरदार व व्यापक आंदोलन उभारण्याचा इशारा यावेळी बाबू गवस यांनी प्रशासनाला दिला आहे.










