युवराज लखमराजेंना दुसऱ्या रांगेत बसवले, याचे मनस्वी दुःख : अर्चना घारे-परब

Edited by: विनायक गावस
Published on: June 09, 2023 15:55 PM
views 184  views

सावंतवाडी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सावंतवाडी शहरातील विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोंसले यांच्या हस्ते मुख्यमंत्र्यांचा नागरी सत्कार करण्यात आला. परंतु शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी संस्थानातील युवराजांना दुसऱ्या रांगेत बसवले हे संयुक्तिक वाटले नाही. याचे मनस्वी दुःख झाले अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब यांनी दिली.


सावंतवाडी संस्थानाचा इतिहास, काम पाहता आजच्या लोकशाहीतही राजघराण्याला एक वेगळे स्थान सावंतवाडीकरांच्या मानत आहे. सावंतवाडीचे मानबिंदू म्हणुनच त्यांच्या हस्ते नागरी सत्कार करण्यात आला. मग राजकारणाचा आदर्श आणि परंपरा लक्षात घेता लखमराजे यांना पहिल्या रांगेत बसवणे गरजेचे होते. मात्र तसे झाले नाही त्यामुळे मनाला वेदना होत आहे. 


दीपक केसरकर हे मुरब्बी राजकारणी आहेत. अनेक वर्षे ते सावंतवाडी शहराच्या माध्यमातून राजकारणात आणि समाजकारणात यशस्वी झाले आहेत. आपल्या प्रत्येक भाषणात ते सावंतवाडी संस्थानाचा व राजघराण्याचा उल्लेख करतात. मात्र, कालच्या कार्यक्रमात त्यांनी केवळ आपली राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी युवराज यांना बोलावले. त्यांच्या हस्ते सन्मान केला. परंतु, त्यांना यथोचित मानसन्मान दिला नाही याबाबत मनस्वी दुःख आहे अस मत अर्चना घारे-परब यांनी व्यक्त केले आहे.