
सावंतवाडी : तालुक्यातील सांगेली येथील जवाहर नवोदय विद्यालयात शिकणाऱ्या तब्बल १२१ विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाली होती. त्यांना अधिक उपचारासाठी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या सर्वांची प्रकृती आता स्थिर असून त्यांच्यावर उपचार करणाऱ्या परिचारिका व डॉक्टरांचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे - परब यांनी आभार मानले आहेत. अचानक आलेल्या परिस्थितीमध्ये सर्व डॉक्टरांनी एकत्र येऊन अगदी युद्धपातळीवर प्रयत्न करून या मुलांना वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले अशी भावना घारेंनी व्यक्त केली. सध्या विषबाधा झालेल्या विद्यार्थ्यांची प्रकृती सुधारत असून लवकरच त्यांना रुग्नालयातून घरी सोडले जाणार आहे.