
दोडामार्ग : सध्या सुरू असलेला प्रचंड उकाडा आणि तोंडावर आलेला पावसाळा या पार्श्वभूमीवर वीज वीतरणने झालेल्या चुका सुधारून दोडामार्ग तालुका वासियांना नियमित वीज पुरवठा करावा. अवकाळी पावसाने जर अत्यंत आवश्यक असलेल्या वीज पुरवठ्याची अशी दैनावस्था होत असेल तर पावसाळा सुरू झाल्यावर काय करणार ? असा खडा सवाल उपस्थित करत झालेल्या चुका सुधारा आणि असलेल्या त्रुटी तत्काळ दूर करून दोडामार्ग वासियांना नियमित वीज पुरवठा करा, अन्यथा शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या आंदोलनाला सामोरं जाण्याची तयारी ठेवा असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या अर्चना घारे-परब यांनी वीज वितरणला दिला आहे.
अवकाळी पावसाने दोडामार्ग तालुक्यात वीज वितरणाच्या गलथान कारभार चव्हाट्यावर आला. शनिवार, रविवार, सोमवार असा ऐन उन्हाळ्यात दोडामार्ग तालुका सलग ३ दिवस विजेविना राहिला. त्यामुळे तालुक्यातील नागरिक, व्यावसायिक सर्वचजण खंडित वीज पुरवठ्यामुळे त्रस्त झाले होते. त्याच पार्श्वभूमीवर अर्चना घारे परब यांनी मंगळवारी दोडामार्ग येथे दाखल होत स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यासह वीज वितरण कार्यालयावर धडक देत अधिकाऱ्यांची चांगलीच कान उघडणी केली.
गेल्या आठवड्यात सलग तीन दिवस वीज खंडित झाल्याने नागरिक, व्यापारी, विक्रेते यांचे झालेले नुकसान तर उकाड्याचा हंगाम आणि तोंडावर आलेला पावसाळा याकडे अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. लवकरात लवकर यावर उपाय योजना कराव्यात अशी मागणीही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या कोकण महिलाध्यक्षा अर्चना घारे-परब यांनी निवेदनाद्वारे वीज वितरण चे उपअभियंता श्री.नलावडे यांच्याकडे केली. याच बरोबर कोनाळकट्टा येथील महालक्ष्मी विद्युत प्रायव्हेट लिमिटेड कंपनी व राज्य शासनाचे महावितरण यांच्यात संपुष्टात आलेला करार पूर्वतव्रत करून भूमिपुत्रांना नियमित वीज द्यावी.
कमी दाबाच्या वीज पुरठ्यावर कायमस्वरूपी तोडगा हवा...
दोडामार्ग शहर विस्तारीकरण व तालुका डेव्हलपमेंट झपाट्याने होत असल्याने दोडामार्गसाठी स्वतंत्र फिडर बसवून मिळणे आवश्यक आहे. सध्या तालुक्याला इन्सुली (ता. सावंतवाडी) येथून ३३ केव्हीने सासोली व कोनाळकट्टा येथील सबस्टेशनला विद्युत पुरवठा होतो. हे अंतर ५५ ते ६० किलोमीटर असल्याने या दोन्ही उपकेंद्रावर विद्युत पुरवठा होईपर्यंत ३३ केव्हीचा हा पुरवठा कमी दाबाचा होऊन १५ ते २० केव्ही एवढा होत आहे. या कमी दाबामुळे विद्युत पुरवठ्यात अनेक अडचणी येत आहेत. बरीचशी विद्युत लाईन ही जंगल भागातून येत असल्याने अनेकदा काही कारणाने बिघाड झाला असता तात्काळ दुरुस्ती करता येत नाही.
त्यामुळे भविष्यातील विजेची गरज लक्षात घेऊन महालक्ष्मी कंपनीची वीज थेट स्वतंत्र फिडर बसवून दोडामार्ग शहर व तालुक्याला द्यावी. अश्या प्रकारचे प्रयत्न व पाठपुरावा आपल्या स्तरावरुन व्हावा. शासन दरबारी दोडामार्ग वासियांच्या भावना पोहोचवाव्यात आणि लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लावण्यासंदर्भात प्रयत्न करावेत. अन्यथा भविष्यात या विरोधात लोकशाही मार्गाने मोठ आंदोलन छेडण्यात येईल असा सज्जड इशारा अर्चना घारे-परब यांनी दिला आहे. यावेळी त्यांचे समवेत जिल्हा उपाध्यक्ष संदिप गवस, विधानसभा युवक अध्यक्ष विवेक गवस, महिला तालुकाध्यक्ष सौ.नाईक, युवक अध्यक्ष गौतम महाले यांसह कार्यकर्ते उपस्थित होते.