वेंगुर्ले शाळा नं १ च्या विविध उपक्रमाबाबत अर्चना घारे यांनी काढले गौरवोद्गार

Edited by: दिपेश परब
Published on: January 28, 2024 14:31 PM
views 77  views

वेंगुर्ले : ‘कवितांचे गाव‘ म्हणून ओळखल्या जाणा-या उभादांडा गावातील शाळा नं.१ ही विविध माध्यम व उपक्रमांतून मुलांचा सर्वांगीण विकास साधत आहे. ही बाब खूप प्रेरणा देणारी असल्याचे सांगून मान्सून फेस्टीव्हल, वक्तृत्व शिरोमणी या सारखे युनिक उपक्रम राबवित असल्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, सावंतवाडी विधानसभा मतदार संघाच्या अध्यक्षा अर्चना घारे-परब यांनी कौतुक केले.

केंद्रशाळा उभादांडा नं.१ शाळेचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ व स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न झाले. शिक्षण प्रेमींनी दिलेल्या कायम ठेवीवरील व्याजातून व मान्सून फेस्टीव्हल उपक्रमासाठी पालकांनी दिलेल्या देणगीतून हा कार्यक्रम घेण्यात आला. पारितोषिक वितरण कार्यक्रमात वर्षभरात विविध उपक्रमांमध्ये व स्पर्धांमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा व पालकांना प्रमुख पाहुणे व मान्यवरांच्या हस्ते बक्षिस देवून सन्मान करण्यात आला. शाळेने राबविलेल्या मान्सून फेस्टीव्हल या अभिनव उपक्रमातील विविध स्पर्धांमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांनाही सन्मानचिन्ह देवून सन्मानित केले. याच दिवशी संध्याकाळी विद्यार्थ्यांचे विविध गुणदर्शनपर कार्यक्रम संपन्न झाले. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या आणि खास आकर्षण असलेल्या ‘माता काळभैरवी‘ दशावतार नाटकाला रसिक प्रेक्षकांनी उत्स्फुर्त दाद दिली.

पारितोषिक वितरण कार्यक्रमावेळी अध्यक्ष नितीन मांजरेकर, उद्योजिका अर्चना घारे, माजी सभापती अनुश्री कांबळी, शिक्षण विस्तार अधिकारी सुनिता भाकरे, उभादांडा सरपंच निलेश चमणकर, उपसरपंच अल्मेडा, अनंत रेडकर,  ग्रामपंचायत सदस्य गणेश चेंदवणकर, मानसी साळगांवकर, गोविंद परूळेकर, शाळा शतकोत्तर अमृत महोत्सव समितीचे सचिव रमेश नरसुले, दिपक बोडेकर, माजी अध्यक्ष संदीप परूळेकर, सायली तांडेल आदी उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता व कौशल्य विकासासाठी उभादांडा नं.१ शाळेत राबविण्यात येणारे सर्वच उपक्रम नाविन्यपूर्ण असून इतर शाळांनी ते राबवायला हवेत. भविष्यात ही शाळा जिल्ह्यातील आदर्श शाळा म्हणून ओळखली जाईल असे नितीन मांजरेकर यांनी सांगितले.  

मान्यवरांचे स्वागत शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गजानन नरसुले, उपाध्यक्ष मनस्वी सावंत, पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष शांताराम भोने, माता पालक संघाच्या उपाध्यक्षा दिव्या नवार यांनी, प्रास्ताविक मुख्याध्यापक गणेश चव्हाण यांनी, निवेदन एकनाथ जानकर व अनिशा झोरे यांनी  तर आभार सुहास रेडेकर यांनी मानले.