'त्या' आरोपीला कठोर शिक्षा करा ; अर्चना घारेंची राज्य महिला आयोगाकडे मागणी

Edited by: विनायक गांवस
Published on: May 30, 2023 19:30 PM
views 152  views

सावंतवाडी : सावंतवाडी कोनशी येथील युवतीचा विनयभंग करत जिवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला कठोर शिक्षा मिळण्यासाठी प्रयत्न करण्यात यावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा सौ.रुपाली चाकणकर यांच्याकडे केली आहे. 


सावंतवाडी तालुक्यातील कोनशी येथील मुलीला त्यांच्याच गावातील युवकाने विनयभंग करून गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेतील आरोपींला कठोर शिक्षा मिळण्यासाठी प्रयत्न करावेत, अश्या आशयाचे निवेदन राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा सौ रुपाली चाकणकर यांना देण्यात आले. या प्रकरणातील दोषी बाबलो शंकर वरक यांस पोलीसांनी गुन्हा दाखल करुन अटक केली व न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनाविण्यात आली आहे. याबाबत मौजे कोनशी परिसरातील सर्व महिला व ग्रामस्थांची विनंती आहे की, दोषी बाबलो शंकर वरक यांस

जामीन मंजूर होउ नये. यासाठी व संबंधित नराधमास कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी आपल्या स्थरावरुन प्रयत्न व्हावेत व पिडीत युवतीस न्याय मिळावा, अशी विनंती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा सौ. रुपाली चाकणकर यांना करण्यात आली आहे. 


" या प्रकरणात मी स्वतः जातीने लक्ष घालेन. आपण पीडित युवतीला न्याय मिळवून देऊ ". असे सांगून सौ. रुपाली चकाणकर यांनी शिष्टमंडळाला आश्वस्थ केले. यावेळी राष्ट्रवादी कोकण विभाग महिला अध्यक्षा सौ.अर्चना घारे, सावंतवाडी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी आदी पदाधिकारी उपस्थित होते .