
सावंतवाडी : राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारमधील मंत्रीमंडळात महिलांना मंत्रीपद नसून मंत्रीमंडळ विस्तार देखील रखडला आहे. याबद्दल बोलत असताना, महिलांना मंत्रीमंडळात स्थान दिले पाहिजे. महिला ही संधीच सोन करते. मग, ती कोणतीही महीला असुदेत अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब यांनी टोला लगावला.
मंत्री कुणाला करायचं किंवा विस्तार कधी करायचा हा सरकारचा प्रश्न आहे. तो विस्तार कधी करायचा हे त्यांच्या हातात आहे. पण, मंत्रीमंडळात महिलांना संधी दिली पाहिजे. महिला ही संधीच सोन करते. मग, ती कोणतीही महीला असुदेत. साधी शेतकरी महिला सुद्धा आपल घर सांभाळून, शेती सांभाळून संसार देखील तेवढ्याच ताकदीने चालवत असते. त्यामुळे प्रत्येक क्षेत्रात महिलेला संधी मिळाली तर ती त्याच सोनं करते. त्यामुळे मंत्रीमंडळात महिलांना संधी मिळाली तर ती राज्याच सोनं करेल असं मत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा सौ अर्चना घारे-परब यांनी व्यक्त केल. महिला सक्षमीकरणासाठी व कौटुंबिक समस्यांबाबत समुपदेशन कायदेशीर मदत व मार्गदर्शनासाठी सावंतवाडीत यशवंतराव चव्हाण सेंटरच्या माध्यमातून आयोजित कार्यशाळेच आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.