
वेंगुर्ले: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या, कोकण विभाग महिला अध्यक्षा तथा अर्चना घारे फाउंडेशनच्या अध्यक्षा अर्चना घारे- परब आणि माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांनी रविवारी शिरोडा येथे लागलेल्या भीषण आगीत नुकसान झालेल्या दुकानांची पाहणी करून व्यापाऱ्यांची भेट घेतली व २५ हजार रुपयांची आर्थिक मदत व्यापारी संघटनेचे अध्यक्ष यांच्याकडे सुपूर्द केली.
या आगीत येथील डॉ साळगावकर यांच्या दवाखान्यासह पाच दुकानांचे मोठे नुकसान झाले आहे. याबाबत अर्चना घारे व प्रवीण भोसले यांनी या व्यापाऱ्यांना भेट देऊन डॉ. साळगावकर व अजित आरावंदेकर यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर माजी आमदार शंकर कांबळी यांच्या कार्यालयात रोख २५ हजार रुपये व्यापारी संघाचे अध्यक्ष राजन शिरोडकर यांच्याकडे सुपूर्द केले. यावेळी माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, माजी आमदार शंकर कांबळी, राष्ट्रवादीचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, पंचायत समितीचे माजी उपसभापती सिद्धेश परब, ग्रा प उपसरपंच चंदन हाडकी, सदस्य मयुरेश शिरोडकर, धकोरे माजी सरपंच अजित नातू आदी उपस्थित होते.