हरली...पण, कोकणकन्या लढली !

Edited by: विनायक गांवस
Published on: November 23, 2024 19:05 PM
views 444  views

सावंतवाडी : सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार अर्चना घारे-परब यांना पराभव पत्करावा लागला.‌ बऱ्याच काळानंतर सावंतवाडी मतदारसंघात एक महिला उमेदवार रिंगणात होती. महाविकास आघाडीकडून तिकीट न मिळाल्यानंतर हार न मानता सात वर्ष जनतेत जाणाऱ्या सौ.‌ घारेंनी दिलेली लढत बघता हरली...पण, कोकणकन्या लढली अशी भावना व्यक्त होत आहे. 

शरदचंद्र पवार राष्ट्रवादीच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब गेली सात वर्षे या मतदारसंघात कार्यरत आहेत.  यावेळी महाविकास आघाडीकडून त्यांना संधी मिळेल अशी अपेक्षा होती.‌ मात्र, ऐनवेळी त्यांना डावललं गेलं. त्यामुळे त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांना यात पराभव पत्करावा लागला. ६१७४ मत त्यांना पडली. मात्र, मातब्बरांसमोर कोकणची ही कन्या लढली याच विशेष कौतुक होत आहे. स्वतः घारे ही म्हणाल्या, ''ना पक्ष ना चिन्ह ना नेते फक्त प्रामाणिक कार्यकर्ता घेवून ही स्वाभिमानाची लढ़ाई लढले. पराभवाचे आत्मचिंतन करुन काम सुरूच ठेवणार !'' मला मतदान केलेल्या सर्व मतदार बंधु भगिनींचे आभार त्यांनी व्यक्त केले.  

सावंतवाडी मतदारसंघातून सन १९५७ ला राजमाता राणी पार्वती देवी या एकमेव महिला आमदार सोडल्या तर त्यानंतर या मतदारसंघात महिला आमदार झाल्या नाही. मतदारसंघातच नाही तर महाराष्ट्र स्थापनेनंतर जिल्ह्यात एकही महिला आमदार झालेली नाही. सावंतवाडीतून राजमाता सत्वशीलादेवी भोंसले, वर्षा पालव या महिला उमेदवारांनी येथून प्रयत्न केला मात्र त्यांना यश आलं नाही. त्यानंतर जवळपास २९ वर्षांनी घारेंच्या रूपानं महिला उमेदवार रिंगणात होती. समोरच्या मातब्बर मंडळींना त्यांनी दोन हात करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पक्ष अन् नेते सोबत नसल्याने त्या काहीशा एकाकी पडल्या. असं असतानाही हार न मानता त्या लढल्या. पराभवाचे आत्मचिंतन करुन काम सुरूच ठेवणार अशी भावना त्यांनी व्यक्त केली.