सावंतवाडी : सावंतवाडी विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार हे अधिकृतरीत्या निवडणूक लढवित असतानाही अपक्ष म्हणून निवडणूक लढवित पक्षशिस्तीस बगल दिल्याने बंडखोर अपक्ष उमेदवार अर्चना घारे-परब यांच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून निलंबित करण्यात आले असल्याची माहिती सरचिटणीस रविंद्र पवार यांनी दिली आहे. दरम्यान, असा कोणताही आदेश पक्षाकडून अधिकृत आलेला नाही. व्हायरल पत्राची सत्यता उद्यापर्यंत कळेल असे पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्याकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे पक्ष कारवाईवरून पुन्हा एकदा संभ्रम निर्माण झाला आहे.
महाविकास आघाडीतून निष्ठावंतांना डावलून उबाठा शिवसेनेकडून राजन तेलींना आमंत्रण देत उमेदवारी देण्यात आली. यानंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या अर्चना घारे-परब यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज भरत कायम ठेवला. यानंतर राष्ट्रवादीचा मोठा गट घारेंसोबत राहीला. जिल्हाध्यक्षांकडून चार दिवसांची मुदत दिल्यानंतरही राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते माघारी फिरले नाहीत. यानंतर उबाठा शिवसेनेचे नेते, माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांच्याकडून घारेंवर कारवाई करण्यासाठी पक्षनेत्यांचे लक्ष वेधले होते. यानंतर आज सरचिटणीस रविंद्र पवार यांनी घारेंच निलंबन केल्याचे पत्र दिल्याचे समोर येत आहे. याबाबत पक्ष निरीक्षकांकडून खुलासा करण्यात आला आहे. असा कोणताही आदेश पक्षाकडून अधिकृत आलेला नाही. व्हायरल पत्राची सत्यता उद्यापर्यंत कळेल असे सांगितले गेले.
दरम्यान, अपक्ष उमेदवार अर्चना घारे-परब यांना विचारले असता असं कोणतेही पत्र प्राप्त झालेलं नाही. शरद पवार हे आमचे दैवत आहेत अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. राष्ट्रवादी श.प.चे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांना याबाबत विचारले असता हे पत्र माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, अपक्ष उमेदवार अर्चना घारे-परब यांसह सर्व प्रमुख नेत्यांना पक्ष नेत्यांकडून पाठविले गेले आहे. मलाही ते पत्र पाठविले आहे. कारवाईबाबतचा उल्लेख पत्रात आहे अशी माहिती त्यांनी दिली.
आज सकाळीच अर्चना घारे-परब यांनी पत्रकार परिषदेत मीच महाविकास आघाडीची उमेदवार आहे असा दावा केला. राजन तेली यांना भाजपने उभे केल्याचे त्यांनी सांगितले होते. यानंतर २४ तासांच्या आत निलंबनाचे पत्र घारेंना आले आहे. मात्र, पक्ष कारवाई वरून संभ्रमाचे वातावरण राष्ट्रवादी श.प.पक्षात निर्माण झाला असून महाविकास आघाडीतील बिघाडी दिवसागणिक वाढत चालली आहे.