मतदारसंघात सुशिक्षित - चारित्र्यसंपन्न उमेदवारावर अन्याय : नकुल पार्सेकर

जोरदार शक्तीप्रदर्शनाने अर्चना घारेंनी उमेदवारी अर्ज केला दाखल
Edited by: विनायक गांवस
Published on: October 25, 2024 09:39 AM
views 336  views

सावंतवाडी : गेली काही वर्षे सावंतवाडी मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या संभाव्य उमेदवार म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जात होते, त्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या कोकण विभागीय महिला अध्यक्षा अर्चना घारे परब यांना महाविकासआघाडीकडून  डावलण्यात आल्यानंतर त्यांनी अपेक्षेप्रमाणे आज  अखेर जोरदार शक्ती प्रदर्शनानंतर आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते नकुल पार्सेकर, राष्ट्रवादीचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, वेंगुर्ले तालुकाध्यक्ष योगेश कुबल, विधानसभा महिला अध्यक्षा नितीशा नाईक, राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष संदीप गवस आदी उपस्थित होते.

महाविकास आघाडी कडून सावंतवाडी मतदारसंघाची जागा ही राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षालाच मिळणार याबाबत सर्वांनाच खात्री होती. काही दिवसांपूर्वी सावंतवाडी मतदारसंघाच्या दौऱ्यावर आलेले राष्ट्रवादीचे पक्षाचे प्रांताध्यक्ष जयंत पाटील यांनी देखील याबाबत दुजोरा दिला होता. मात्र, काही दिवसांपूर्वी भाजपमधून सेनेत दाखल झालेले राजन तेली यांना शिवसेना उबाटा गटाकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर महाविकास आघाडीत बिघाडी होणार हे निश्चित झाले होते. त्याच पार्श्वभूमीवर गेले आठ वर्ष सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात सातत्याने कार्यरत असलेल्या अर्चना घारे परब यांनी अखेर रणशिंग फुंकत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी येथील वैश्य भवन येथील सभागृहात त्यांनी जाहीर मेळावा घेत आपली भूमिका जाहीर केली. कोकणच्या स्वाभिमानासाठी तसेच महिलांच्या उद्धारासाठी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी आपण या निवडणुकीत लढण्याचा निर्णय घेतला आहे असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. गेली आठ वर्षे या मतदारसंघात कार्यरत असताना येथील विकासाबाबत सर्वसामान्य मतदारांच्या असलेल्या भूमिका आपण जाणून घेतल्या असून त्यांना न्याय देण्यासाठी आपण ही निवडणूक लढवीत आहे . 'आता माघार नाही रडायचं नाही लढायचं ' असा नारा देत त्यांनी ही निवडणूक लढणार असल्याचे जाहीर केले.

यावेळी उपस्थित सर्वच पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित ग्रामस्थ व महिला यांनी अर्चना घारे परब यांना एक मुखी पाठिंबा देत ही निवडणूक त्यांनी लढवावी यासाठी समर्थन दिले. महाविकास आघाडीच्या राजकारणात एका सुशिक्षित व चारित्र्यसंपन्न चांगल्या उमेदवारावर अन्याय होत असून त्या अन्यायाला वाचा फोडलीच पाहिजे त्यासाठी ही निवडणूक लढविणे गरजेचे आहे असे यावेळी सामाजिक कार्यकर्ते नकुल पार्सेकर यांनी सांगितले. तर सावंतवाडी सारख्या मतदार संघातील सुसंस्कृत मतदारांनी यावेळी आपली योग्य भूमिका घेणे गरजेचे असल्याचे सामाजिक कार्यकर्ते तथा व्याख्याते प्रा. रुपेश पाटील म्हणाले. दिवस-रात्र महिला व ग्रामस्थांसाठी कार्यरत असलेल्या अर्चनाताई घारे यांच्यावर झालेला अन्याय म्हणजे आपणा सर्वांवर झालेला अन्याय असून त्याला वाचा फोडलीच पाहिजे असे यावेळी राष्ट्रवादीचे सावंतवाडी तालुका अध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी सांगितले. या मेळाव्यानंतर जोरदार शक्ती प्रदर्शन करीत सौ. अर्चना घारे परब यांनी आपला उमेदवारी अर्ज प्रांताधिकारी कार्यालयात सादर केला. त्यावेळी राष्ट्रवादीचे पदाधिकारी कार्यकर्ते महिला व सर्वसामान्य ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.