
दोडामार्ग : पाल पुनर्वसन (कुडासे खुर्द) येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळेचे छप्पर कोसळल्याची घटना घडली होती. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) कोकण विभागीय महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब यांनी शाळेला भेट देत पाहणी केली. शाळा दुरुस्तीसाठी शासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही शासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच धोकादायक इमारतीत मुलांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. यासाठी तातडीने प्रयत्न करण्याची मागणी आपण गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे करणार, असे त्यांनी स्पष्ट केले.
पाल पुनर्वसन येथील जिल्हा परिषद शाळेची इमारत तिलारी पाटबंधारे विभागाने १९९३ साली बांधली होती. या इमारतीचे छप्पर पूर्णतः कमकुवत झाले अन सोमवारी दुपारच्या सुमारास एका वर्गातील छप्पराच्या स्लॅपचा काही भाग अचानक कोसळला. दरम्यान विद्यार्थ्यांच्या भोजनाची वेळ झाल्याने त्या वर्गात मुले नव्हती व सुदैवाने मोठा अनर्थ टळला. या घटनेची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या कोकण विभागीय महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब यांना मिळताच त्यांनी शाळेला भेट देत पाहणी केली.
कोसळलेल्या ठिकाणी खडी स्पष्टपणे दिसत असून निकृष्ट दर्जाचे काम झाले असल्याचा त्यांनी आरोप केला. तसेच शाळेला अनेक ठिकाणी आडव्या भेगा पडल्या असून इमारत पूर्णतः धोकादायक बनली आहे. अशा धोकादायक इमारतीत अनेक वर्षे मुले शिकत आहेत. सोमवारी घडलेली दुर्घटना अतिशय दुर्दैवी असून सुदैवाने मुले वाचली असे त्या म्हणाल्या. धोकादायक इमारती बाबत वारंवार शासनाकडे पाठपुरावा करूनही शासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. या धोकादायक इमारतीत वर्ग भरविल्यास मुलांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे लवकरच येथील गटशिक्षणाधिकारी यांच्याशी चर्चा करून मुलांच्या सुरक्षिततेबाबत आवश्यक त्या उपाययोजना करण्याबाबत सांगितले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी सोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष प्रदीप चांदेलकर, उपजिल्हाध्यक्ष संदीप गवस, शहराध्यक्ष सुदेश तुळसकर, पाल पुनर्वसन सरपंच श्रद्धा नाईक व ग्रामस्थ उपस्थित होते.










