
दोडामार्ग : दोडामार्ग तिलारी मार्ग रुंदीकरणासाठी संबंधित ठेकेदार मनमानी कारभार करत आहे. एकेरी वाहतूक सुरु ठेवून त्याच मार्गावर यंत्र सामुग्री पाईप वैगरे ठेवल्याने वाहनांना अडचण होत आहे. कोणत्याही क्षणी अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ठेकेदाराने नियोजन करून स्थानिकांना विश्वासात घेऊन काम करावे. रस्त्याच्या बाजूला ठेवलेले सामान सोमवार पर्यंत हटवावे अन्यथा मंगळवारी रस्त्याचे बंद पाडू असे युवा सेना तालुका प्रमुख मदन राणे व संदेश राणे यांनी म्हटले आहे.
ते बोलताना पुढे म्हणाले की दोडामार्ग तिलारी रस्ता रुंदीकरण होत आहे. दोडामार्गच्या विकासाच्या दृष्टीने चांगले आहे. असाच दोडामार्गचा विकास होत राहो. मात्र दोडामार्ग तिलारी रस्ता रुंदीकरण करत असताना समंधित ठेकेदार जो मनमानी कारभार करत आहे ते योग्य नाही. रस्ता रुंदीकरण करत असताना एकेरी वाहतूक सुरु ठेवली मात्र एकेरी वाहतूक सुरु ठेवलेल्या मार्गावर ठेकेदाराने रुंदीकरणासाठी लागणारे सामान ठेवल्याने वाहन चालकांनी वाहन कसे चालवावे? असा प्रश्न उपस्थित होत आहे. या कामामुळे रस्त्यावर कोणाचाही जीव गेला तर याला जबाबदार कोण राहणार ? हे काम करत असताना संबंधित विभागाचा एकही माणूस त्या ठिकाणी नाही. मोरी, गटार याचे काम करताना कुचकाम्या पद्धतीने काम केले जातं आहे. यात मोठा भ्रष्टाचाही होत असल्याचा राणे यांनी आरोप केला आहे.
त्यामुळे या रस्त्याचे काम करत असताना योग्य रीतीने व स्थानिकांना विश्वासात घेऊन काम करा एकेरी वाहतूक सुरु असताना त्या वाहनांना कोणताही अडथळा होणार नाही यांची दक्षता घ्या. रस्त्याच्या दोन्ही बाजूने ठेवलेले सामान तात्काळ हटवा व रस्ता वाहतुकीस खुला करून द्या. अन्यथा मंगळवारी रस्त्याचे काम बंद पाडू असा इशारा मदन राणे व संदेश राणे यांनी दिला आहे.










