नियम डावलून रेल्‍वे स्टेशन सुशोभिकरण निविदांना मंजूरी : परशुराम उपरकर

Edited by: उमेश बुचडे
Published on: February 06, 2024 14:00 PM
views 151  views

कणकवली : सार्वजनिक बांधकामचे कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांनी नियम, निकष डावलून सिंधुदुर्गातील रेल्‍वे स्थानकांच्या निविदा मंजूर केल्‍या आहेत. एवढेच नव्हे तर त्‍यांच्या कार्यक्षेत्राबाहेर चिपळूण, रत्‍नागिरी, संगमेश्‍वर येथील रेल्‍वे स्थानक सुशोभिकरणाच्या निविदांनाही त्‍यांनी कणकवली कार्यालयात फोडून मंजूरी दिली आहे. सर्वगोड यांच्या या मनमानी कारभाराविरोधात मनसेतर्फे १५ फेब्रुवारीला आंदोलन छेडले जाणार असल्‍याचा इशारा मनसे नेते परशुराम उपरकर यांनी आज दिला.

येथील मनसे संपर्क कार्यालयात श्री.उपरकर यांनी पत्रकार परिषद घेतली. ते म्‍हणाले, सिंधुदुर्ग आणि रत्‍नागिरी जिल्ह्यातील रेल्‍वे स्थानक सुशोभिकरणाची कामे सध्या सुरू आहेत. मात्र ही कामे पनवेल येथील पी.डी. इन्फ्रा या मर्जीतील ठेकेदारांना देण्यात आली आहेत.  तर सावंतवाडी स्टेशन चे काम के. व्ही. पाटील अँड कन्स्ट्रक्शन ला काम दिले. रेल्‍वे स्थानक सुशोभिकरण कामांचे एकच टेंडर आले असेल तर फेरनिविदा प्रक्रिया होणे आवश्‍यक होते. मात्र तसे करण्यात आलेले नाही. तसेच ३ कोटी रूपयांपेक्षा अधिकची कामे मुख्य किंवा अधीक्षक अभियंता कार्यालयात उघडणे आवश्‍यक असते.  परंतु श्री. सर्वगोड यांनी आपल्या दालनात ही टेंडर फोडून अधीक्षक अभियंता तिथे उपस्थित असल्याचे दाखवले आहे. प्रत्‍यक्षात त्‍यांची सही नाही. यावरून सर्वगोड टेंडर कसे मॅनेज करतात हे उघड होत आहे.

 सिंधुदुर्ग चे अधीक्षक अभियंता कार्यालय सुरू झाल्या नंतर त्या पदाचा कार्यभार स्वतःकडे घेण्यासाठी सर्वगोड यांची खटपट आहे. मात्र अधीक्षक अभियंता पदाचा कार्यभार सर्वगोड याना घेऊ देणार नाही. जोपर्यंत कायमस्वरुपी अधीक्षक अभियंता येत नाही, सर्व कर्मचारी येत नाही तोपर्यंत कार्यालय चालू देणार नाही. कार्यकारी अभियंता सर्वगोड हे मनमानी कारभार करत आहेत. त्याविरोधात १५ फेब्रुवारी रोजी ठिय्या आंदोलन केले जाईल,असे श्री उपरकर यांनी सांगितले.