आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झालेल्या संतोष गवस यांच्यावर कौतुकाचा वर्षाव

झोळंबे सरपंच विशाखा नाईक यांनी केलं अभिनंदन
Edited by: संदीप देसाई
Published on: September 05, 2023 17:42 PM
views 166  views

दोडामार्ग : ग्रामस्थ, विद्यार्थी आणि शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व  सदस्य यांच्यासोबत सर्व सहकारी शिक्षकांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळेच आपल्या हातून उतम कार्य घडू शकले असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हा परिषद उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार २०२३ प्राप्त शिक्षक संतोष गवस यांनी केले. शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येला मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजीत नायर यांनी जिल्ह्यातील तालुकानिहाय आठ शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहिर केले. 

    त्या निमित्त झोळंबे गावचे सरपंच विशाखा नाईक, केंद्रप्रमुख गुरुदास कुबल व सहकारी शिक्षकांनी पुरस्कार प्राप्त शिक्षक गवस यांच अभिनंदन केलं यावेळी ते बोलत होते. दोडामार्ग तालुक्यातून जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा झोळंबे या शाळेतील उपक्रमशील शिक्षक संतोष गवस यांना यावर्षीचा आदर्श शिक्षक पुरस्कार जाहिर झालाय. त्या निमित्त मंगळवारी शिक्षकदिनी शाळा व्यवस्थापन समिती, शाळा व ग्रामस्थ यांच्यावतीने शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.

याप्रसंगी झोळंबे सरपंच विशाखा नाईक, उपसरपंच विनायक गाडगीळ, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा साक्षी परब, कोलझर केंद्रप्रमुख गुरुदास कुबल, मोरगाव शाळेचे पदवीधर शिक्षक ज्ञानेश्वर सावंत, स्वयंसेवक देवेंद्र भैरवकर,  भाग्यश्री गवस उपस्थित होते. 

कोलझर केंद्रप्रमुख गुरुदास कुबल यांनी पुरस्कार प्राप्त शिक्षक संतोष गवस यांचे कौतुक करताना सांगितले की गवस सर मुळातच हुशार , प्रामाणिक,  हरहुन्नरी व संपन्न व्यक्तिमत्वाचे आहेत. आम्ही फक्त पैलू पाडण्याचे काम केले. समाज संपर्काद्वारे शाळेच्या विकासात त्यांचा मोलाचा वाटा आहे. सर्वांना एकत्र करून काम करण्याची त्यांच्यात असलेली हातोटी वाखणण्यासारखी आहे.

     झोळंबे सरपंच विशाखा नाईक यांच्या हस्ते डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. मुख्याध्यापक प्रवीण देसाई यांनी उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक केले. तर सूत्रसंचालन व आभार शिक्षिका शीतल गवस यांनी केले.