
वेंगुर्ले : सातत्याने ३६ वर्षे चिमुकल्यांच्या आयुष्यात त्यांना त्यांचे पहिले हक्काचे व्यासपीठ देण्याचे काम वेंगुर्लातील जागृती मंडळाने केले आहे. आज हीच मुले मोठी होऊन विविध क्षेत्रात चमकत आहेत. जागृती मंडळाने वेंगुर्ल्यातील बालमनावर कला, क्रीडा व सांस्कृतिक संस्कार करण्याचे घेतलेले व्रत स्तुत्य आहे. कै संजय मालवणकर यांनी या महोत्सवाला एका विशिष्ठ उंचीवर नेऊन ठरवले होते. त्यांच्या निधनानंतर हा वसा त्यांचा शिष्य व परिवार पुढे नेतोय हे पाहून आनंद होतोय. पुढेही त्यांचे कार्य निरंतर चालू राहो, आपला नेहमीच त्याला पाठिंबा असेल, असे प्रतिपादन जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य सचिन वालावलकर यांनी केले.
येथील जागृती कला क्रीडा सांस्कृतिक मंडळाच्या ३६ व्या कला क्रीडा सांस्कृतकि महोत्सवाचे उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. बालवाडी ते दहावीपर्यंतची मुले आणि पालकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या या महोत्सवात विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आहे. येथील सिद्धिविनायक मंगल कार्यालयात महोत्सवाचा शुभारंभ सचिन वालावलकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी माझा वेंगुर्लाचे कार्याध्यक्ष संजय पुनाळेकर, कलावलयचे अध्यक्ष सुरेंद्र उर्फ बाळू खामकर, शिवसेनेचे वेंगुर्ले शहरप्रमुख उमेश येरम, भाजप युवामोर्चाचे वेंगुर्ले तालुका पदाधिकारी प्रितम सावंत, ज्येष्ठ क्रीडा प्रशिक्षक जयराम वायंगणकर, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख हर्षद डेरे, सामाजिक कार्यकर्ते विलास दळवी अरविंद चव्हाण, जागृती मंडळाचे अध्यक्ष दिलीप मालवणकर, परीक्षक चित्रा प्रमूखानोलकर व प्रतिमा चव्हाण आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
दीप्रज्वलन व श्रीफळ वाढवून महोत्सवाचा शुभारंभ करण्यात आला. तर कै. संजय मालवणकर व कै. विठ्ठल मालवणकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी ज्येष्ठ नाट्यकर्मी संजय पुनाळेकर यांनीही महोत्सवास शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, जागृतीचे कार्य खुप मोठे आहे. त्याकाळी क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात पिछाडीवर असलेल्या वेंगुर्ल्याला खऱ्याअर्थाने जागृती मंडळाने उभारी दिली. जागृतीचे खेळाडू राष्ट्रीय पातळीवर चमकले आहेत. अनेकांना पहिले व्यासपीठ जागृतीनेच दिले. त्यामुळे व्यक्तिमत्व घडविणाऱ्या या मंडळाचे कार्य अलौकीक आहे. यापुढे जागृतीने बालरंगभूमीसाठी योगदान द्यावे. नाट्यकर्मी या नात्याने सर्वतोपरी सहकार्य करेन, असे ते म्हणाले.
मान्यवरांचे स्वागत जागृतीचे सचिव अमोल सावंत, सांस्कृतिक प्रमुख विवेक राणे, क्रीडा प्रमुख प्रशांत मालवणकर, स्पर्धा प्रमुख एश्वर्या मालवणकर, पिंट्या कुडपकर, शशिकांत परब, विश्वास पवार, अमृत काणेकर, पंकज शिरसाट, नवनाथ सातार्डेकर, संजिवनी चव्हाण, रुपा वेंगुर्लेकर, ज्योत्स्ना जाधव, शेखर साळगावकर, हळीहप्पा तलवार, इशा मालवणकर यांनी केले. प्रास्ताविक व सूत्रसंचालन महेंद्र मातोंडकर यांनी केले.