अशोक सावंत यांची जिल्हा नियोजन समितीवर विशेष निमंत्रित सदस्यपदी नियुक्ती

Edited by: कृष्णा ढोलम
Published on: January 03, 2024 15:59 PM
views 117  views

मालवण : सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समितीवर विशेष निमंत्रित सदस्य म्हणून माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा भाजप जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे, पालकमंत्री रविंद्र चव्हाण, भाजप मालवण कुडाळ विधानसभा प्रमूख माजी खासदार निलेश राणे यांच्या शिफारशीनुसार ही निवड करण्यात आली आहे. अशी माहिती भाजप मालवण तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी सांगितले. या नियुक्ती बाबत महाराष्ट्र शासन जिल्हा नियोजन विभाग पत्रही प्राप्त झाल्याचे त्यांनी सांगितले. 

अशोक सावंत यांचा राजकीय प्रवास 90 च्या दशकात शाखाप्रमुख पदापासून सुरू झाला. मालवण पंचायत समिती सभापती ते सिंधुदुर्ग जिल्हापरिषद अध्यक्ष अशी विविध पदे त्यांनी भूषवली. भाजप पक्ष संघटनेतही जिल्हास्तरावर देण्यात आलेली सरचिटणीस, उपाध्यक्ष ही प्रत्येक जबाबदारी त्यांनी समर्थपणे पार पाडत आहेत. मात्र पद, प्रतिष्ठा या सर्वांपेक्षा राणे साहेबांचा निष्ठावंत कार्यकर्ता हेच पद आपल्यासाठी सर्वोच्च आहे. असे अशोक सावंत यांनी सांगितले.

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकीय पटलावर तीन दशकांपेक्षा जास्तकाळ ते सक्रिय राजकारणात कार्यरत असताना कोणताही स्वार्थपणा न ठेवता स्वच्छ प्रतिमा आणि निष्ठेचा एक आदर्श त्यांच्या माध्यमातून प्रस्तापित करण्यात आला. राजकीय व सामाजिक जीवनात सक्रियपणे कार्य करत असणाऱ्या अशोक सावंत यांच्या सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समिती विशेष निमंत्रित सदस्य नियुक्ती नंतर त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.